४० वर्षांच्या विकासकामांचा बॅकलॉग १० वर्षांत भरून काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:52+5:30
बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगर येथे बुधवारी आयोजित जाहीर सभेत नवनीत राणा बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघाचा रवि राणांनी केलेला विकास सरस आहे. मतदारसंघातील अन्य उमेदवारांना महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा कोणत्याही निवडणुकीचा गंध नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इतरांना हेवा वाटेल असा बडनेरा मतदारसंघाचा विकास रवि राणा यांनी केला आहे. ४० वर्षांत कधी झाली नाहीत, ती विकासकामे अवघ्या १० वर्षांत झालेली आहेत. त्यांनी विकासकामांचा बॅकलॉग भरून काढला आहे, असा दावा खासदार नवनीत राणा यांनी येथे केला.
बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगर येथे बुधवारी आयोजित जाहीर सभेत नवनीत राणा बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघाचा रवि राणांनी केलेला विकास सरस आहे. मतदारसंघातील अन्य उमेदवारांना महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा कोणत्याही निवडणुकीचा गंध नाही. त्यामुळे मतदारसंघाचा विकास कोण करणार, असा सवाल त्यांनी नागरिकांना केला. रवि राणा मुंबईपासून अमरावतीपर्यंत विकासकामे खेचून आणतात, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. त्यांनी १० वर्षे बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना राजकारणाला महत्त्व न देता समाजकारण, विकासाला प्राधान्य दिले. बडनेरा मतदारसंघातील कोडेंश्वर मार्गालगत २८ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, निवडणुकीनंतर पायाभरणी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवनीत राणा यांचा ‘रोड शो’
स्थानिक गोपालनगर परिसरात खासदार नवनीत राणा यांनी रोड शोच्या माध्यमातून मतदारांना आशीर्वाद मागितला. गोपालनगर परिसर पिंजून काढताना मतदारांसोबत त्यांनी संवाद साधला. विकास आणि न्यायासाठी रवि राणा यांना पुन्हा विधानसभेत निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.