विद्यापीठाच्या अंतिम वर्ष वगळता बॅकलॉग परीक्षा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:43+5:302020-12-22T04:12:43+5:30
अमरावती : अंतिम वर्ष वगळता अन्य सत्रांच्या बॅकलॉग तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून महाविद्यालय स्तरावर प्रारंभ होणार आहेत. ...
अमरावती : अंतिम वर्ष वगळता अन्य सत्रांच्या बॅकलॉग तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून महाविद्यालय स्तरावर प्रारंभ होणार आहेत. १५ ते २० डिसेंबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठ अंतर्गत बॅकलॉगचे सुमारे ९० हजार विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून नोंदविले गेले आहेत. बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा, प्रश्नपत्रिका, मू्ल्यांकन आदी बाबी महाविद्यालयांना कराव्या लागतील. २२ ते ३० डिसेंबर या कालावधीत परीक्षांचे नियोजन करून गुण विद्यापीठात पाठवावे लागणार आहेत. ही परीक्षा असाईनमेंट पद्धतीने होणार असून, एकूण चार प्रश्न विचारले जातील. चार प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला १० गुण राहतील. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षा शक्यतो ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियाेजन करावे, अशा सूचना विद्यापीठाने पत्रातून प्राचार्यांना केल्या आहेत. परीक्षेशी निगडीत आवश्यक साहित्य महाविद्यालयांत पोहचविण्यात आले आहे.
------------
बॉक्स
एम.फिल. परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्वारे
एम.फिल. परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्वारे घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना तयार कराव्या लागतील. ४० प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांना कोणतेही २० प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एक तासाचा अवधी मिळेल. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा वेळ अतिरिक्त दिला जाणार आहे. परीक्षा संपताच १५ दिवसांत पेपर गोपनीय विभागात जमा करावे लागणार आहेत.
-----------
कोरोना नियामवलींचे पालन करून महाविद्यालयांना परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. प्राचार्यांना पत्र पाठविले असून, ३० डिसेंबरपर्यंत परीक्षा आटोपून गुण पाठवावे लागतील, असे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले.