१३ तालुक्यांत क्रीडा अधिकारीपदाचा अनुशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:11+5:302021-03-14T04:13:11+5:30
अमरावती : राज्य शासनाच्या क्रीडाविषयक उदासीन धोरणामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यांत क्रीडा अधिकाऱ्यांचे पद रिक्त ...
अमरावती : राज्य शासनाच्या क्रीडाविषयक उदासीन धोरणामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यांत क्रीडा अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहेत. यात केवळ चांदूर रेल्वे तालुक्याचा अपवाद वगळता सर्व तालुक्यांचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. पिरणामी खेळांचा विकास खुंटला असून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी १३ तालुक्यांत क्रीडा अधिकारीपद भरण्यात आले नाहीत. नियमानुसार प्रत्येक तालुक्याला एक क्रीडा अधिकारी असणे गरजेचे आहे. यात चांदूर रेल्वे तालुका वगळता अन्य एकाही तालुक्यात क्रीडा अधिकाऱ्यांचे पद भरण्यात आले नाही. राज्यात २००० मध्ये केवळ ३१ अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली. त्यात चांदूर रेल्वेचे एक पद भरण्यात आले. त्यानंतर दरवर्षी रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. २०१२ मध्ये राज्यात ६९ क्रीडा अधिकाऱ्यांची मंजूर पदे भरण्यात आली होती. मात्र, यावेळी जिल्ह्यात एकही पद भरण्यात आलेले नाही. इतर तालुक्यांना क्रीडा अधिकारी मिळाला नसल्याने जिल्ह्याच्या क्रीडा कार्यालयातून अनेक वर्षांपासून १३ तालुक्यांचा कारभार हाकला जात आहे. गावागावांत वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या गुणवंत खेळाडू दुर्लक्षित राहत असून त्यांना संधी मिळत नाही. तालुकास्तरावर खेळाडूंची विविध प्रश्न अडचणीचे सोडविण्याचे व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तालुकास्तरावरील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांवर असते. परंतु क्रीडा अधिकारीपद रिक्त असल्याने कोणत्या शासकीय योजनांचा पाहिजे तसा खेळाडूंना फायदा होत नाही. शासनाच्या क्रीडाविषयक उपक्रमाबाबत सर्वसामान्य जनतेत आणि खेळाडूंमध्ये नेहमीच उत्सुकता असते. मात्र, हे उपक्रम राबवून खेळाडूंना पुरेशी संधी आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्यासंदर्भात पुरेसे प्रयत्न रिक्त पदामुळे होऊ शकत नाहीत. क्रीडाविषयक चळवळ गतिमान करून त्याच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील गुणी आणि होतकरू खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध देणे आवश्यक आहे. तालुका पातळीवर तालुका क्रीडा अधिकारी हे क्रीडा खात्यातील महत्त्वाचे पद रिक्त असल्याने तेथील कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. क्रीडा चळवळ गतिमान होण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
मार्गदर्शनाअभावी खेळाडूंची अभाव
केवळ अंजनगाव सुजी याच तालुक्यात क्रीडा संकुल जागा उपलब्ध नसल्याने होऊ शकले नाही. तेथे क्रीडा संकुलाकरिता जागेचा शोध सुरू आहे. मात्र, अन्य १३ तालुक्यांत क्रीडा संकुल आहेत. परंतु चांदूर रेल्वे तालुक्याचा अपवाद सोडला तर सर्वच तालुक्यांच्या क्रीडा अधिकाऱ्याची जबाबदारी प्रभारींवर सोपविली आहे.
बॉक्स
मुख्यालयातील अधिकाऱ्यांवर धुरा
चांदूर रेल्वे येथे नियमित क्रीडा अधिकारी कार्यरत आहेत. यांच्याकडे धामणगाव रेल्वे, नांदगाव खंङेश्र्वर तालुक्याचा प्रभार आहे. मुख्यालयातील ४ क्रीडा अधिकारी यांच्याकडे प्रत्येकी दोन ते तीन तालुक्यांचा अतिरिक्त पदभार आहे. याही अधिकाऱ्यांना मुख्यालयातील जबाबदारीचे कामे करून आठवड्यातून एक दिवस संबंधित ठिकाणी कामकाज पहावे लागत आहे.
कोट
जिल्ह्यात फक्त चांदूर रेल्वे येथे तालुका क्रीडा अधिकारी कार्यरत आहेत. अन्य तालुक्यांचा कारभार मुख्य कार्यालयातून बघितला जात आहे. ही रिक्त पदे भरण्याकरिता सतत शासनादरबारी पाठपुरावा केला जात आहे. लवकरच ही पदे भरली जाण्याची अपेक्षा आहे.
- गणेश जाधव,
जिल्हा क्रीडा अधिकारी