कृषी विभागात रिक्त पदांचा अनुशेष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:36+5:302021-09-11T04:14:36+5:30
अमरावती/ संदीप मानकर जिल्हा कृषी विभागात गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदांचा अनुशेष वाढत चालला असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह ...
अमरावती/ संदीप मानकर
जिल्हा कृषी विभागात गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदांचा अनुशेष वाढत चालला असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह सात तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकाचा प्रभार दुसऱ्यावर, तर दुसऱ्याच्या प्रभार तिसऱ्यावर देण्याची वेळ आल्याने अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांची कामे कशी होणार, असा सवाल केला जात आहे. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांची कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था प्राचार्य म्हणून बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेचा प्रभार कृषी उपसंचालक अनिल खर्चान यांना देण्यात आला आहे. ते कृषी उपसंचालक या मूळ पदावर कार्यरत असताना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्याकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा प्रभार असल्याने त्यांचाही ताण वाढला आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील दोन कृषी अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे १ सप्टेंबरपासून रिक्त झाली आहेत, तर ग्रामीणमधील पाच तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे गेल्या एक वर्षापासून रिक्त असल्याने जिल्ह्यातील इतर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे या पदांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. कृषी कार्यालयातील तांत्रिक अधिकाऱ्यांची ५ पदे रिक्त असल्याने कृषी विभागातील कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे त्यांचा चार्ज इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आला असून, त्यांचाही ताण वाढला आहे. खरीप हंगाम असल्याने व सध्या पावसाने अनेक तालुक्यांतील पिकांचे नुकसान केल्याने त्याची अपडेट माहिती शासनाला पाठवावी लागत आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे अधिकाऱ्यांना कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्त पदांचा अनुशेष शासन केव्हा दूर करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही रिक्त पदे भरावी, अशी मागणी होत आहे.