परतवाडा प्रशासन झोपेत; दुकानदार मजेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:57+5:302021-04-20T04:12:57+5:30
रस्त्यावर फिरणाऱ्या ६१ जणांची तपासणी : दोन पॉझिटिव्ह, दुचाकीस्वारांची भागम भाग परतवाडा : लॉकडाऊन काळात अकारण फिरणाऱ्या ६१ ...
रस्त्यावर फिरणाऱ्या ६१ जणांची तपासणी : दोन पॉझिटिव्ह, दुचाकीस्वारांची भागम भाग
परतवाडा : लॉकडाऊन काळात अकारण फिरणाऱ्या ६१ जणांची शहरातील जयस्तंभ चौकात तपासणी करण्यात आली. त्यात दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना बघून दुचाकीस्वार मिळेल त्या मार्गाने पळताना दिसून आले. दुसरीकडे दुकाने उघडे ठेवून दुकानदार विक्री करीत होते. त्यामुळे कोरोना संपल्याचे चित्र शहरात होते. परतवाडा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत किंवा नाही, असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
अचलपूर तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने शहरात ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. परंतु, कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवा उघडता सर्व बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तथापि, काही ज्वेलरी, हार्डवेअर, कापड, जनरल स्टोअर्स आदींचे कालपर्यंत अर्धवट डाऊन असलेले शटर आज अधिक प्रमाणात उघडे दिसून आले. या दुकानदारांसाठी प्रशासनाने वेगळा नियम काढला की त्यांंना व्यवसायाची मूकसंमती देण्यात आली, हे मात्र कळू शकले नाही. दुसरीकडे नेमण्यात आलेली पथके व त्यांनी शनिवार आणि रविवारी कोरोना नियमाचे पालन न करता दुकान उघडे ठेवणाऱ्यांवर केलेली कारवाई गुलदस्त्यात राहिली.
पळापळ
रविवारी जयस्तंभ चौक येथे पोलीस आरोग्य व महसूल विभागाच्यावतीने कोविड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर विनामास्क फिरणारे आढळून आल्यास त्यांचीही पोलिसांनी पकडून तपासणी करून घेतली. या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आल्यास थेट बुरडघाट येथील कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. जयस्तंभ चौकात आरोग्य पथक व पोलिसांना पाहताच दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने पळून जाताना दिसले.