अवकाळीचा ६.३२ लाख हेक्टरला फटका; ६७२ कोटींची मागणी, विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 3, 2024 06:57 PM2024-01-03T18:57:22+5:302024-01-03T18:57:40+5:30
२६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान पिकांचे नुकसान
गजानन मोहोड, अमरावती: नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भात ११.१० लाख शेतकऱ्यांच्या ६.३२ लाख हेक्टरमधील खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. पाचही जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीसाठी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी ६७१.९२ कोटींची मागणी शासनाकडे केली.
२६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ दरम्यान अवकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. यामध्ये सर्वाधिक २,१६,९७३ हेक्टरमध्ये कपाशीचे नुकसान झालेले आहे. अवकाळीमुळे फुटलेला कापूस बोंडातच भिजल्याने कापसाची प्रतवारी खराब झालेली आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात ३१५ हेक्टरमधील गहू जमीनदोस्त झाला. तसेच १.५४ लाख हेक्टरमधील तुरीचा फुलोरा गळला आहे.
रब्बी हंगामातील १.१७ लाख हेक्टरमधील हरभरादेखील अवकाळीने बाधित झाला. शिवाय सात हजार हेक्टरमधील ज्वारीचे नुकसान झालेले आहे. इतर काही पिकांचे ३२०० हेक्टर, असे एकूण ८.८३ लाख शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांचे पाच लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. यासाठी ४२३.७६ कोटींच्या निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा शासनाकडे करण्यात आली.