वादळासह अवकाळी : १ ठार, तीन गंभीर; २९ जनावरे मृत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 07:25 PM2024-04-12T19:25:27+5:302024-04-12T19:25:34+5:30
७० हजार हेक्टरला फटका : तीन हजार घरांची पडझड, बाधित क्षेत्र वाढणार
अमरावती : पश्चिम विदर्भात चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यात एक व्यक्ती मृत, तीन जखमी, तीन हजार घरांची पडझड व ७० हजार हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. या बाधित पिकांच्या पंचनाम्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. आपत्तीग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
गुरुवारी रात्री अमरावती व्यतिरिक्त अन्य चार जिल्ह्यात पुन्हा काही गावांना वादळाचा फटका बसल्याने बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले. विभागात ८ ते १० एप्रिल या तीन दिवसांमध्ये वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने ३५ तालुक्यांमधील १२६१ गावांना फटका बसला आहे. यामध्ये ६९,३५३ हेक्टरमधील गहू, हरभरा, उन्हाळी मूग, ज्वारी, केळी, लिंबू, संत्रा, पपई, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झालेले आहे. या जिल्ह्यात १५६६ घरांची पडझड झालेली आहे, शिवाय १३ पशुधनाचा मृत्यू झाला.
अकोला जिल्ह्यात ५५ घरांची पडझड, तर यवतमाळ जिल्ह्यात ५८१ घरांची पडझड झाली. आर्णी तालुक्यात एका महिलेचा मृत्यू व तीन जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ३०९ घरांची पडझड व १३ गुरांचा मृत्यू झाला. याशिवाय वाशिम जिल्ह्यात ३५६८ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आहे.