वीटभट्ट्यांच्या प्रदूषणाने बडनेरा शहर धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:15 PM2018-04-13T22:15:07+5:302018-04-13T22:15:07+5:30
दीडशे वीटभट्ट्यांमुळे बडनेरा शहर व परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नियमानुसार केवळ एकमेव चिमणी भट्टी उभारण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीटभट्ट्या सुरू असाव्यात मात्र अनेक वर्षांपासून प्रदूषण व महसूल विभाग याविषयी चुप्पी का साधतात, असा सवाल एकमेव असणाऱ्या चिमणीने उपस्थित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा/अमरावती : दीडशे वीटभट्ट्यांमुळे बडनेरा शहर व परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नियमानुसार केवळ एकमेव चिमणी भट्टी उभारण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीटभट्ट्या सुरू असाव्यात मात्र अनेक वर्षांपासून प्रदूषण व महसूल विभाग याविषयी चुप्पी का साधतात, असा सवाल एकमेव असणाऱ्या चिमणीने उपस्थित केला आहे.
अमरावती शहरासह इतरत्रही बडनेऱ्यातूनच बांधकामासाठी विटा पुरविल्या जातात. वीटभट्ट्यांसाठी बडनेरा शहर सर्वदूरपर्यंत चर्चेत आहे. दरवर्षी येथे वनजमीन, महसूलच्या जागेवर नियमबाह्य नवीन विटभट्ट्या उभ्या होत आहे. लाखो रूपयांची उलाढाल वीटभट्टी व्यवसायातून होत आहे. बहुतांश वीटभट्ट्या अवैध उभारल्या असून, महसूल विभागाची यात मोठी ‘वसुली’ मोहीम सुरू आहे. महसूल विभागासह अन्य सर्वच प्रशासनाच्या आशिर्वादाने येथे वीटभट्ट्यांचे प्रस्थ वाढले आहे. सुमारे दीडशे वीटभट्ट्या असल्याची माहिती आहे. बडनेरा शहरालगत शाळा-महाविद्यालय परिसराला वीटभट्ट्यांच्या प्रदूषणाचा प्रचंड त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या विटभट्ट्यांमुळे बडनेरा शहर व परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे.
वीटभट्ट्यांचा धुराळा हवेत पसरावा यासाठी प्रत्येक वीटभट्टी चालकांना चिमणी बसविणे बंधनकारक आहे. मात्र, बडनेरा शहर व परिसरातील वीटभट्ट्यांमध्ये केवळ एकमेव चिमणी भट्टी सुरू आहे. नियमबाह्य वीटभट्ट्या सुरू असताना यातून निघणाºया प्रदूषणाकडे प्रदूषण विभाग का चुप्पी साधून आहे, याबाबत बडनेरा शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्रदूषणासह वीटभट्ट्यांचे तापमान परिसरातील महाविद्यालय आणि तेथून ये-जा करणाऱ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. या प्रदूषणाचा धोका लक्षात घेवून प्रदूषण विभागाने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.
‘महसूल’ची वसुली जोरात?
शहरासह बडनेऱ्यात नियमबाह्य विटभट्ट्या सुरु असताना त्या बंद करण्याऐवजी महसूल विभागाच्या ‘वसुली’ने त्या राजरोसपणे सुरू आहेत. तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचा आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. गत दोन दिवसांपूर्वी शहरासह बडनेºयातील अवैधरीत्या सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्यासाठी वनविभागाने नोटीस बजावल्या .वनविभागाला ते े दिसून आले, तर महसूल विभागाला का दिसू नये, यातच गुपित दडले आहे.