बडनेरा रेल्वेस्थानक असुरक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:51 AM2018-12-14T00:51:40+5:302018-12-14T00:52:10+5:30
स्थानिक रेल्वेस्थानकावर एका १९ वर्षांच्या मुलाला २५ हजार व्होल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीची सेल्फी काढण्याच्या नादात जबर धक्का बसला. यापूर्वीदेखील अशीच एक घटना घडली. अशा प्रकरणांमुळे बडनेरा रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे.
श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : स्थानिक रेल्वेस्थानकावर एका १९ वर्षांच्या मुलाला २५ हजार व्होल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीची सेल्फी काढण्याच्या नादात जबर धक्का बसला. यापूर्वीदेखील अशीच एक घटना घडली. अशा प्रकरणांमुळे बडनेरा रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे. आरपीएफ, जीआरपी रेलवे स्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करतात तरी काय, असा सवाल भयग्रस्त प्रवासी तसेच शहरसीयांमध्ये विचारला जात आहे.
तीन वर्षांपूर्वी बडनेरा रेल्वे स्थानकावर एका विद्यार्थ्यांचा पेट्रोलने भरून असणाºया टॅँकवर मोबाइलमध्ये सेल्फी काढत असताना २५ हजार वोल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. तो पुण्याचा होता. इतर मित्रांसोबत अमरावतीत अभ्यास दौºयासाठी आला होता. तसेच नुकतेच १० डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथील १९ वर्षीय युवक अंकुश चव्हाण हा सेल्फी काढण्याच्या नादात ओव्हरहेड विद्युत वाहिनीकडे खेचला गेला. तो खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. हादेखील एका ज्वलनशील असणाºया टॅँकरवर चढला होता, असे बोलले जात आहे. अशा दोन घटनांमुळे आरपीएफ, जीआरपीचे रेल्वे स्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष आहे का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे या रेल्वे स्थानकावरील एका कॅन्टीनलादेखील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ती आग विझविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. नुकताच एका प्रवाशाचा कटून मृत्यू झाला. अशा घटना येथे नित्याच्याच झाल्या आहेत. एकूणच या घटनांमध्ये आरपीएफ व जीआरपीच्या कार्यक्षमतेवर प्रवासी वर्गांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मोबाईलचोर सक्रिय
रेल्वे स्थानकावर मोबाईल व पाकीटमारीच्या घटना रोज घडत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे येथे चोरटे सक्रिय झाले आहे. विभागीय शहराला लागून असल्याने बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याचाच चोरटे गैरफायदा घेत आहे. प्रवासी तक्रारी देत नसल्याने त्यांचे फावत आहे.
स्टॉलधारकांचा माल जातो रुळावरून
स्टॉलधारक सर्रास त्यांचा माल रेल्वे रुळावरुन नेतात. मालगाडी असो की प्रवासी गाडी त्यांना रेल्वेच्या नियमाची कुठलीच भीती वाटत नाही. त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई केली जाते. त्यांचा माल ब्रिजवरुनच प्लॉटफॉर्मवर यायला पाहिजे. हा सर्व धोकायदायक प्रकार प्रशासनाच्या डोळ्यासमोरच होत असतो.
अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांचा भरणा
बडनेरा रेल्वे स्थानकावर अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांची दादागिरीच असल्याचे चित्र आहे. मनमानी कारभार येथे सुरू आहे. पोलिसांचा धाकच नसल्याने अवैध खाद्य पदार्थ विक्रेते मोठ्या संख्येत रेल्वे स्थानकात शिरले आहेत. चढ्या भावात विक्री होत आहे.