बडनेरावासी पीत आहेत घाण पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:19 PM2018-01-10T23:19:48+5:302018-01-10T23:20:16+5:30

जुन्या वस्तीच्या दत्तवाडी परिसराकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये नाल्यांचे घाणपाणी जात आहे.

Badneras are drinking dirty water | बडनेरावासी पीत आहेत घाण पाणी

बडनेरावासी पीत आहेत घाण पाणी

Next
ठळक मुद्देनगरसेवक कशासाठी? : लिकेज पाईपलाईन

श्यामकांत सहस्त्रभोजने ।
आॅनलाईन लोकमत
बडनेरा : जुन्या वस्तीच्या दत्तवाडी परिसराकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये नाल्यांचे घाणपाणी जात आहे. ही पाईपलाईन सहा महिन्यांपासून लिकेज आहे. त्यामुळे नगरसेवक व संबंधित प्रशासन काय करतात, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
दत्तवाडी परिसरात जाणारी जीवन प्राधिकरणची मुख्य पाईपलाईन लिकेज आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी देऊनही जीवन प्राधिकरणद्वारे थातूर-मातूर उपाय करण्यात आले. चक्क दोन नाल्यांचे घाणपाणी थेट लिक झालेल्या पाईपलाईनमध्येच जात आहे. तेच घाणपाणी नळांद्वारे ग्राहकांना प्यावे लागत आहे. या परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. या घाणपाण्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासन व नगरसेवकांना याबाबत अनेकदा सांगूनदेखील काम होत नसल्याने त्यांच्याप्रती नागरिकांमध्ये संतप्तपणे बोलले जात आहे. किती दिवस घाण पाणीच प्यायचे, असा प्रश्न विचारल्या जात आहे.
कंत्राटदारांचा उर्मटपणा
फुटलेली पाईपलाईन आतापर्यंत थातूर-मातूर दुरुस्ती करणारा कंत्राटदार नागरिकांशी उर्मटपणे बोलत असल्याचे या परिसरातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे. तुम्ही जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बोला, यापेक्षा काहीही करू शकत नाही, असे या कंत्राटदाराचे उत्तर असल्याचे योगेश निमकर यांनी सांगितले.
नियोजनाचा अभाव
मागील सहा महिन्यांपासून दत्तवाडी परिसरातील नागरिकांना घाणपाणी प्यावे लागत आहे. सतत येथील पाईपलाईन फुटलेली असते. मात्र, या पाईपलाईनजवळूनच सांडपाणी वाहून नेणाऱ्या दोन नाल्यांचे घाणपाणी सरळ रस्त्यावर येत आहे. पर्यायाने फुटलेल्या पाईपलाईनमध्ये शिरत आहे. पाईपलाईनचे नियोजनदेखील नगरसेवक करीत नसल्याने नगरसेवक कशासाठी, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Badneras are drinking dirty water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.