बडनेऱ्याच्या आठवडी बाजारात नियमांना तिलांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:15 AM2021-02-16T04:15:00+5:302021-02-16T04:15:00+5:30
बडनेरा : कोरोनाग्रस्तांच्या दरदिवशी वाढत्या संख्येचा नागरिकांवर काहीही परिणाम होत नसल्याचे बडनेऱ्याच्या सोमवार आठवडी बाजारातील गर्दीवरून स्पष्ट होत आहे. ...
बडनेरा : कोरोनाग्रस्तांच्या दरदिवशी वाढत्या संख्येचा नागरिकांवर काहीही परिणाम होत नसल्याचे बडनेऱ्याच्या सोमवार आठवडी बाजारातील गर्दीवरून स्पष्ट होत आहे. येथे मोजकेच ग्राहक व दुकानदार मास्क लावून होते. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात बडनेरा शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता, हे विशेष.
परिसरातील सर्वात मोठा बाजार म्हणून बडनेर्यातील सोमवार आठवडी बाजाराची ओळख आहे. शेकडोंच्या संख्येत भाजी विक्रेते बाजारात येत असतात. लगतच्या खेड्यावरील तसेच अमरावती शहराच्या साईनगर, गोपालनगर, नवाथेनगरपर्यंतचे नागरिक या बाजारात खरेदी करण्यासाठी येतात. सध्या जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच डोके वर काढले आहे. गर्दीच्या ठिकाणी संसर्ग पसरण्याची भीती असताना, बडनेर्यातील आठवडी बाजारात मात्र ८० टक्के दुकानदार व खरेदीदारांनी मास्क न लावता, बाजारात येण्याचे धाडस केल्याचे चित्र दिसून पडते आहे.
-----------
कोरोनाची काहीशी धास्ती बाजारात रोडावलेल्या गर्दीवरून दिसून पडत आहे, अन्यथा इतर वेळेस या बाजारात प्रचंड गर्दी असते. रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसते. प्रशासनाने या ठिकाणच्या बाजारावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातला मोठा बाजार असल्याने येथून संसर्ग वाढण्याची दाट भीती शहरवासीयांनी वर्तविली आहे. बैल बाजार हेदेखील येथील गर्दीची ठिकाणे आहेत.