बडनेरा रेल्वे स्थानकावरील लगेज स्कॅनर झाले जुगार अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:07 PM2018-07-27T22:07:39+5:302018-07-27T22:08:46+5:30
अतिरेकी कारवायांपासून बचाव आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले लगेज स्कॅनरच आता असुरक्षित आहे. बाहेरील व्यक्तींनी त्याचा ताबा मिळविला आहे. जुगार खेळणे आणि सिगारेटचे झुरके ओढण्यासाठी त्याचा वापर होत आहे. या गंभीर बाबीकडे रेल्वे सुरक्षा बलाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.
Next
ठळक मुद्देबाहेरील व्यक्तींचा कब्जा : सुरक्षा बलाचे अक्षम्य दुर्लक्ष
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिरेकी कारवायांपासून बचाव आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले लगेज स्कॅनरच आता असुरक्षित आहे. बाहेरील व्यक्तींनी त्याचा ताबा मिळविला आहे. जुगार खेळणे आणि सिगारेटचे झुरके ओढण्यासाठी त्याचा वापर होत आहे. या गंभीर बाबीकडे रेल्वे सुरक्षा बलाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत प्रवाशांकडील संशयास्पद साहित्याची तपासणी करण्यासाठी लगेज स्कॅनर लावण्यात आले आहे. ये-जा करतेवेळी प्रवाशांनी सामान, साहित्याची तपासणी या स्कॅनरमधूनच करावी, असे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने रेल्वे प्रशासनाने लगेज स्कॅनर हाताळण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाकडे सोपविली आहे. तथापि, हे अतिशय महागडे लगेज स्कॅनर बेवारस स्थितीत ठेवण्याचा अफलातून प्रकार रेल्वे सुरक्षा बलाने चालविला आहे. बडनेरा रेल्वे स्थानक हे ‘अ’ दर्जाचे आहे. येथून दरदिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवासासाठी गाड्या धावतात. हजारो प्रवाशांचे अवागमन होत असूनही रेल्वे सुरक्षा बलाने २५ लाखांचे लगेज स्कॅनर बेवारस सोडणे आश्चर्यकारक मानले जात आहे. काही महिने ते व्यवस्थित हाताळण्यात आले. मात्र, आता रेल्वे सुरक्षा बलाने त्याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे.
केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, लगेज स्कॅनर, मेटल डिटेक्टर, हॅन्डमेड डिटेक्टर आदी अद्यावत यंत्रसाम्रगीचा वापर करीत आहे. मात्र, हल्ली मनुष्यच नव्हे, भटकी कुत्रीही लगेज स्कॅनरच्या आश्रयाने निवांत बसत असल्याचे चित्र आहे. हे स्कॅनर बेवारस असल्याने त्यावर बाहेरील व्यक्तींनी कब्जा केला आहे. याबाबत बडनेरा रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश बढे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाही.
लगेज स्कॅनरवर खेळला जातो जुगार
बडनेरा रेल्वे स्थानकावरून रात्रीचा प्रवास करणे धोकादायक ठरू शकतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तैनात पोलीस कर्मचारी रात्री कुठे कर्तव्यावर असतात, हा संशोधनाचा विषय आहे. तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म, पोलीस चौकशीवर रात्रीला पोलीस नसतात, तर रेल्वे साहित्याचे संरक्षण करण्याच्या नावाने गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कोठे कर्तव्य बजावतात, हा प्रश्नदेखील यानिमित्त उपस्थित झाला आहे. ठाणे नोंदवही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासली, तर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील, असे सूत्रांनी सांगितले.
चोरटे, खिसेकापूंचा वावर
बडनेरा रेल्वे स्थानकावर चोरटे, खिसेकापूंचा वावर वाढला आहे. लगेज स्कॅनरवर बसून जुगार खेळण्यापर्यंत काहींनी मजल गाठली आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असताना, प्रवासी कितपत सुरक्षित, हा प्रश्नच आहे.