बहिरमच्या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 08:37 PM2019-01-17T20:37:21+5:302019-01-17T20:43:21+5:30
वारकरी सांप्रदायात रिंगण सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रिंगण सोहळा विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील बहिरम या तीर्थक्षेत्री मागील वर्षीपासून सुरू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वारकरी सांप्रदायात रिंगण सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रिंगण सोहळा विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील बहिरम या तीर्थक्षेत्री मागील वर्षीपासून सुरू झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी ही एक पर्वणीच असते. या आनंदोत्सवाला विदर्भातील वारकऱ्यांची मोठी गर्दी होती.अश्वाच्या पायाखालील माती मस्तकी धारण करण्यासाठी, तसेच ती माती तुळशीवृंदावनात ठेवण्यासाठी गुरुवारी ५० हजार वारकऱ्यांनी अश्वरिंगण सोहळ्याला हजेरी लावली.
सर्व पालख्यांचे, दिंड्यांचे व रिंगण सोहळातील दोन अश्वांचे पूजन बहिरम बाबाच्या मंदिरात संस्थेच्या अध्यक्षांनी केली. तेथून सर्व पालख्या, दिंडी मार्गाने 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करीत बैतूल मार्गावरील रिंगण सोहळ्यात पोहोचली. सर्व पालखी, दिंडीचे यावेळी पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वप्रथम पताका धारक वारकऱ्यांनी रिंगनसोहळ्यात प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर मृदंग वादकांनी मृदंग गळ्यात घेऊन रिंगण प्रदक्षिणा केली. या रिंगण सोहळ्याची विशेष बाब म्हणजे अस्वा आधी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तालुक्यातील पिंपरी येथील ६९ वर्षाच्या गिताबाई ठाकरे या माऊलीने रिंगण प्रदक्षिणा धावून पूर्ण केल्या. ही माऊली आजचा रिंगण सोहळ्याची आकर्षण ठरली. त्यानंतर अश्व रिंगणाचा सोहळा सुरू झाला. आळंदी येथील चिंचोळे सरकार यांचे माऊलीच्या दोन अश्?वांनी रिंगण सोहळ्यात पाच धाव प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
अश्व रिंगणात धावताच ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांच्या जय घोष टाळ-मृदंगाच्या साथीने आसमंत दुमदुमला. रिंगन सोहळ्याप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी बहिरम बाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील चौधरी, किशोर ठाकरेंसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या रिंगण सोहळ्यात येथील भक्तधामचे संत गुलाबराव महाराज, लाखनवडी येथील गुणवंत महाराज यांचा पालखीसह २७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या.