२० डिसेंबरपासून फुलणार बहिरम यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:01 AM2018-12-14T01:01:58+5:302018-12-14T01:02:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर बाजार : विदर्भाचे वैभव असलेल्या बहिरम यात्रेस यंदा २० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ग्रामीण संस्कृतीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : विदर्भाचे वैभव असलेल्या बहिरम यात्रेस यंदा २० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी ही यात्रा ‘शासकीय यात्रा’ म्हणून कधी गणली जाणार, अशी अपेक्षा वजा प्रश्न बहिरमबाबांच्या भक्तजनांतर्फे केला जात आहे. या यात्रेतील दुकानांसाठी १० ते १२ डिसेंबरदरम्यान बहिरम येथे लिलाव होणार आहे.
मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी भरणारी बहिरम यात्रा ही ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आपल्या कुळदैवताला नवस फेडण्याकरिता येत असतात. या यात्रेत शेतकरी बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. यात्रेत नवनवीन शेती साहित्य, अवजार विक्रीकरिता येतात. तसेच शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी बहिरम यात्रेच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जात होती. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे या यात्रेत शेतकरीभिमुख कार्यक्रमांचे आयोजन आता केले जात नाही. त्यामुळे शासनाच्या योजनांपासून अनेक शेतकरी कोसोदूर आहेत.
जिल्हा परिषदेला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न देणाºया या यात्रेत शिरजगाव, करजगाव, परतवाडा, कारंजा, बहिरम, मुलताई, बैतुल, भैसदेही या भागातील दुकानदार दुकाने थाटतात. पूर्वी घुंगराच्या आवाजाकरिता प्रसिद्ध असणारी ही यात्रा आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने तमाशामुक्त झाली. त्या जागी शंकरपट, कुस्तीसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची काही काळ रेलचेल सुरू राहिली. त्यानंतर झेडपीच्या तत्कालीन अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी बहिरम यात्रेला ‘यात्रा महोत्सव’चे स्वरूप मिळवून दिले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून यात्रेत मोठी रेलचेल वाढली होती. यंदा गुलाबी थंडीत बहिरम यात्रेत हंडी व रोडग्याच्या मैफली रंगण्यास, बहिरम यात्रेच्या निमित्ताने सुरुवात होत आहे. ही यात्रा ‘शासकीय यात्रा’ व्हावी तसेच बहिरामबाबांना शासकीय पूजेचा मान मिळवून देण्याकरिता जनप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.