कारागृहाच्या पाषाण भिंतीआड जाण्यापूर्वीच रेड्डींना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:14 AM2021-05-12T04:14:18+5:302021-05-12T04:14:18+5:30
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आरोपी श्रीनिवास रेड्डी यांचा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आरोपी श्रीनिवास रेड्डी यांचा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे रेड्डींना आता कारागृहाच्या पाषाण भिंतीआड जावे लागणार नाही. त्यांना येथील अंध विद्यालयात तात्पुरते कारागृहात १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. न्यायालयाकडून आदेश प्राप्त होताच ते या क्वारंटाईन कक्षातूनच बाहेर पडतील.
निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्ह दाखल करून १ मे रोजी अटक करण्यात आली होती. धारणी पोलिसांत दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर रेड्डींना न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात पाठविण्यात आले. परंतु, कोविड-१९ च्या नियमानुसार नवीन कैद्यांना कोरोना चाचणीनंतर कारागृहात रवानगी करण्यापूर्वी १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन राहावे लागते. त्यानुसार रेड्डी हे तात्पुरत्या कारागृहात बंदिस्त होते. मात्र, उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याने आता त्यांना क्वारंटाईनमधूननच सोडण्यात येणार आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना रेड्डी यांना नागपूरबाहेर न जाण्याचे आदेश दिले तसेच राज्य सरकारला नोटीस बजावून रेड्डी यांच्या जामीन अर्जावर ७ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तूर्तास रेड्डींना दिलासा मिळाला आहे. जामीन मिळाल्याने त्यांना कारागृहाच्या पाषाण भिंतीआड जाण्याचा योग आला नाही, हे विशेष.