बेलोरा विमानतळ वळण मार्ग निर्मितीच्या नव्याने निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 11:59 PM2016-08-21T23:59:42+5:302016-08-21T23:59:42+5:30
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचा कायापालट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा : प्राधिकरणाच्या वेगवान हालचाली
अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचा कायापालट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पूर्वी संरक्षण भिंत निर्मितीसाठी जळू ते बेलोरा या गावादरम्यान वळण मार्ग निर्मितीच्या निविदा काढल्या जाणार आहेत. त्याकरिता महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने बांधकाम विभागाकडून दरपत्रक मागविले आहे.
यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन सचिव मीना यांनी बेलोरा विमानतळ वळण मार्गासाठी लागणाऱ्या १३.२८ कोटी रुपयांचा खर्चावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे दोन वर्षांपासून जळू ते बेलोरा वळण मार्गासाठी प्राप्त दरकराराच्या फाईलवर कोणताही निर्णय होऊ शकला नाही, हे वास्तव आहे. मात्र मीना हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवपदी गोयल हे आले आहेत. प्रलंबित फार्इंलीचा निपटारा करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. बेलोरा विमानतळाचे विकास कामे त्वरेने मार्गी लागावे, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. रवि राणा हे सतत प्रयत्नशील आहेत. विमानतळाच्या वळण मार्गाचा प्रश्न सुटल्याशिवाय बेलोरा विमानतळाचे विकास काम करणे अशक्य असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मांडली आहे. जळू ते बेलोरा दरम्यान ३. ९० कि. मी. च्या वळण मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १३.२८ कोटी रुपयांचे दरपत्रक पाठविले आहे. सामान्य प्रशासन विभागाने या दरपत्रकाला मंजुरी दिली की बांधकाम विभाग वळण मार्गाच्या निर्मितीसाठी नव्याने निविदा काढणार, असे संकेत आहेत. या मार्गासाठी लागणारे भूसंपादन पाच वर्षांपूर्वीच झाले आहे. सदर प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र बेलोरा विमानतळाच्या वळणमार्ग निर्मितीची फाईल मंत्रालयात प्रलंबित असल्याने हा मार्ग त्वरेने निर्माण होऊ शकला नाही. परंतु वळण मार्ग निर्मितीत येणारे अडथळे दूर करण्यात लोकप्रतिनिधींना यश आले आहे. येत्या महिनाभरात बेलोरा ते जळू वळण मार्ग निर्मितीच्या निविदा प्रसिद्ध करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता निर्मितीची जबाबदारी सोपविली जाणार आहे.