मेळघाटात तीन महिन्यांत ६० बालमृत्यू, आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 07:33 PM2017-12-13T19:33:19+5:302017-12-13T19:33:32+5:30
धारणी(अमरावती) : मेळघाटातील धारणी तालुक्यात गत तीन महिन्यांत ६० बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.
धारणी(अमरावती) : मेळघाटातील धारणी तालुक्यात गत तीन महिन्यांत ६० बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. यामुळे शासन स्तरावरून चालविण्यात येणा-या योजना मेळघाटात कुचकामी ठरल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पातून मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण पाहिल्यावर ते लक्षात येते.
सप्टेंबर महिन्यात २२, आॅक्टोबर २८, तर नोव्हेंबरमध्ये १० बालकांचा मृत्यू झाला. मेळघाटात आरोग्य यंत्रणेने चांगले काम करावे, यासाठी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी अनेक दौरे केले. नागरिकांशी संवाद साधला. टेली मेडिसिन सेवा सुरू केली. आरोग्य यंत्रणेने मेळघाटातील प्रत्येक गावात जाऊन सेवा द्याव्यात, असे आदेशही दिले. मात्र, डॉक्टरांची कमतरात, दुर्गम भाग व अज्ञान यामुळे कुपोषणावर तोडगा काढण्यात शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या व आशा सेविकांच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंगणवाडी सेविकांची मोठी भूमिका
मेळघाटात आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा वाटा आहे. मेळघाटात काही ठिकाणी बालकांना व गर्भवतींना पोषण आहार पुरविण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडे आहे. यासोबतच अंगणवाडी सेविका आरोग्यसेवा सुधारण्यात पुढाकार घेतात. २४ दिवस अंगणवाडी सेविकांचा संप सुरू होता. या काळात मेळघाटात आरोग्याविषयी जनजागृती झाली नाही, हे बालमृत्यूच्या प्रमाणावरून दिसते.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील महिन्यांची आकडेवारी अद्याप माझ्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र, याबाबत विचारणा करून पावले उचलू.
- शरद जोगी,
तालुका आरोग्य अधिकारी
अंगणवाडी सेविकांकडे अनेक कामे असतात. आता तर निवडणुकीचे कामही लावले आहे. अंगणवाडी सेविका सामाजिक भान जपून काम करीत असल्याने मेळघाटातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात शासनाला यश आले आहे.
- बी. के. जाधव,
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघ (आयटक)