बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अमरावती एसीबीसमोर; कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
By प्रदीप भाकरे | Published: January 17, 2023 01:53 PM2023-01-17T13:53:26+5:302023-01-17T13:57:34+5:30
1 हजारावर शिवसैनिक कार्यालयाबाहेर ठाण मांडून; अमरावती शहर पोलीस आयुक्तालायचा चोख बंदोबस्त
अमरावती : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बाळ गळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदारनितीन देशमुख हे मंगळवारी अमरावतीच्या एसीबीच्या परीक्षेत्रात चौकशीसाठी हजर झाले आहेत. यावेळी अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील ठाकरे प्रणित शिवसेनेने राज्यसरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. 50 खोके एक्दम ओक्के.. या घोषनेने कार्यालय परिसर दणाणून गेला.
एसीबीने देशमुख यांना अमरावती परीक्षेत्र कार्यालयात १७ जानेवारीला अमरावती इथे हजर होण्यासाठी नोटीस बजावली होती. नितीन देशमुख यांनी चौकशीनिमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन करून अमरावतीत आले. आज अकोल्यातून जवळपास ७०० कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती इथे दाखल झाले आहेत. तर उर्वरित सर्व कार्यकर्ते दर्यापूर येथून देशमुख यांच्यासोबत अमरावतीकडे आले आहेत. अमरावतीतूनही जवळपास एक हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते आमदार देशमुख यांच्यासोबत अमरावतीत आले आहेत. त्यांनी कथित तक्रारदाराचं आणि मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाची ऑडियो क्लीप आपल्याकडे असल्याचा दावा केला.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती कार्यालयात दुपारी 12.30 च्या सुमारास देशमुख यांनी पत्रकरशी संवाद साधला. आपण एकनाथ शिंदेच्या दडपशाहिला घाबरणार नाही. आपण त्यावेळी गोहाटीला न जाता शिंदे गटाचे बिंग फोडले, त्यामुळे सरकारपुरस्कृत ही कारवाई केली जात असल्याचे देशमुख म्हणाले.
देशमुख हे सोबत कपडे घेऊन आले
आपल्याला अटक होईल, या पार्श्वभूमीवर नितीन देशमुख पूर्ण तयारी करून अमरावतीत आलेत. बाळापूरातून निघण्यापूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांना औक्षण केले. आपल्याला अटक करतील, त्या हिशोबाने तयारीलाच लागलो, म्हणून आज घरून कपड़े घेऊन सोबत चाललोय. कारण की हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे, इंग्रजापेक्षा हे खराब लोक आहेत म्हणून आम्ही मानसिकता केलेली आहे की आम्ही गेल्यावर आम्हाला जेलात जरी टाकलं तर काही फरक नाही पडत. त्या हिशोबाने आम्ही कपडे सोबत घेतले. कारण मागील वेळेस सुरतला गेलो होतो तेव्हा माहिती नव्हतं म्हणून कपडे सोबत नेले नव्हते, आज यावेळी कपड़े अन् पूर्ण करून जातोय, असं ते म्हणाले.
खुद्द देशमुखांनी दिली होती माहिती
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या विरुद्ध अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार देण्यात आली. देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने, यांसह अनेक शेत-जमिनी असल्याचा आरोप करीत अकोल्यातील एका व्यक्तीने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली आहे. ही माहिती खुद्द शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली होती.
नितीन देशमुख काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की माझ्याविरुद्ध तक्रार करणारा हा अकोल्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, लुटमारी, ३२३, ३२६, ३०७ यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. या तक्रारदाराला अकोल्यातील भूखंड माफिया, म्हणजे अकोल्याच्याच शिवसेनेच्या माजी आमदाराचा पाठिंबा आहे. याबरोबरच शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचा देखील पाठिंबा असल्याचे देशमुख म्हणाले. दरम्यान, अमरावतीच्या एसीबीच्या काही लोकांनी बाळापूर परिसरात म्हणजेच देशमुख यांच्या मतदारसंघात पाहणी करून देशमुख यांच्या संदर्भात चौकशी केल्याचे समजते.
तक्रारदार अन् मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप
दरम्यान तक्रारकर्ता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप माझ्याकड़ं आली आहे, एसीबीला तक्रारदार संदर्भात माहिती मागितली असून तक्रारदार तोच आहे असे निष्पन्न झाल्यास मुख्यमंत्री अन् त्या व्यक्तीची ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर ठेवल्या जाईल. असेही देशमुख म्हणाले. आतापर्यंत नागपूर पोलिसांसह अकोला लोहमार्ग पोलीस आता एसीबी कडून नोटीस प्राप्त झाली असून हे सर्व माझ्याविरुद्ध षडयंत्र रचल्या जात असल्याचे म्हणाले.
'भाजपच्या एकाही व्यक्तीवर ईडीची कारवाई नाही'
आतापर्यंत राज्यात ईडी कडून फक्त मराठी माणसांवर कारवाया झाल्या. अन्य लोक काय लोटे घेवून आले का? त्यांच्याकडे देखील अब्जो रुपयांच्या संपत्ती आहेत. दरम्यान, भाजपच्या लोकांनी आतापर्यंत अब्जावधी रुपयांच्या संपत्ती गोळा केल्या आहेत. जवळपास ३५०च्या वर लोकसभा खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, १ हजारांवर त्यांचे आमदार आहे. परंतु यातील एकाही व्यक्तीवर आतापर्यंत इडी असो एसीबी असो, कारवाई झाली नाही. यांच्या किती संपती आहे. कुठून आणला यांनी एवढा पैसा? असे प्रश्न नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे. मराठी माणसांकडे मागील पिढीची संपत्ती आहे, हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. परंतु मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचे काम भाजप करत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय.