बाळापूरचे आमदार समर्थकांसह धडकले विभागीय आयुक्त कार्यालयावर
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 9, 2023 06:27 PM2023-10-09T18:27:56+5:302023-10-09T18:28:12+5:30
अकोला जि. प.चे सदस्य आशिष दातकर यांच्यावर अतिक्रमण प्रकरणात अपात्रतेची कारवाई प्रस्तावित आहे.
अमरावती : अकोला जि. प.चे सदस्य आशिष दातकर यांच्यावर अतिक्रमण प्रकरणात अपात्रतेची कारवाई प्रस्तावित आहे. यासंदर्भात बाळापूरचे शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शेकडो समर्थकांसह विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी धडक दिली. तसेच खोटे प्रकरण प्रस्तावित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडे केली.
यासंदर्भात अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव असल्याचा आरोप आ. देशमुख यांनी केला. जि. प. सदस्य आशिष दातकर यांनी अकोला तालुक्यातील हिंगणी शिवारात वहिवाटीच्या सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता अडविल्याबाबत त्या गावातील सरपंच व भाजप कार्यकर्त्यांची खोटी तक्रार असल्याचे आ. देशमुख म्हणाले. प्रत्यक्ष मोका पाहणीत असे काहीही न आढळल्याचे अहवालात नमूद आहे.
मात्र, राजकीय दबावात जिल्हाधिकारी अकोला यांनी दातकर यांचा अपात्रतेचा प्रस्ताव पाठविला व विभागीय आयुक्तांनी अनुमोदित केलेले नसताना विभागीय उपायुक्तांनी शासनाला पाठविला असल्याचे देशमुख म्हणाले. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव पाठविल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली. यावेळी अमरावती व अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते.