तिजोरीचे नवे शिलेदार बाळासाहेब भुयार अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:28 PM2019-03-08T22:28:42+5:302019-03-08T22:29:12+5:30
महापालिकेची तिजोरी सांभाळणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदी बाळासाहेब भुयार यांची शुक्रवारी अविरोध निवड झाली. चार विरोधी सदस्य या विशेष सभेला अनुपस्थित होते. या निवडणुकीत पाच अर्जांची उचल करण्यात आली. विहित कालावधीत भुयार यांचा एकच अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तथा विभागीय अप्पर आयुक्त मंगेश मोहिते यांनी भुयार यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. भुयार हे स्थायीचे २८ वे सभापती ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेची तिजोरी सांभाळणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदी बाळासाहेब भुयार यांची शुक्रवारी अविरोध निवड झाली. चार विरोधी सदस्य या विशेष सभेला अनुपस्थित होते. या निवडणुकीत पाच अर्जांची उचल करण्यात आली. विहित कालावधीत भुयार यांचा एकच अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तथा विभागीय अप्पर आयुक्त मंगेश मोहिते यांनी भुयार यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. भुयार हे स्थायीचे २८ वे सभापती ठरले.
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राखणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदाचा विवेक कलोती यांनी १ मार्चला राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ ८ मार्चला संपुष्टात येणार असल्याने नगरसचिवांनी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांना पत्र देऊन निवडणुकीसाठी तारीख मागितली होती. आयुक्तांच्या आदेशानुसार ८ मार्चला ही निवडणूक घेण्यात आली. या विशेष सभेला विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त मंगेश मोहिते हे पीठासीन अधिकारी होते. या सभापतिपदासाठी भाजपने दोन, एमआयएमने दोन व काँग्रेसने एक अशा पाच अर्जांची उचल केली होती. त्यामुळे सभागृहात भाजपचे बहुमत असले तरी निवडणूक अविरोध होणार नाही, असा सर्वांचा अंदाज होता. प्रत्यक्षात विहित कालावधीत १०.०२ वाजता बाळासाहेब भुयार यांचा एकमेव अर्ज नगरसचिव प्रदीप वडुरकर यांच्याकडे दाखल झाला. भुयार यांच्या अर्जावर सूचक चेतन गावंडे व अनुमोदक राजेश कल्लूप्रसाद साहू यांची स्वाक्षरी आहे.
सभेला ११ वाजता सुरुवात झाल्यानंतर एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी भुयार यांची अविरोध निवड जाहीर केली. सभागृहात विरोधी पक्षाचे प्रशांत डवरे, अस्मा फिरोज खान, मो. शबीर मो. नासीर व रजिया खातून हे सदस्य अनुपस्थित होते. यावेळी ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी अन् घोषणाबाजी करीत भाजपजनांनी जल्लोश केला. महापालिकेतून पक्ष कार्यालय व आ.डॉ. सुनील देशमुख यांच्या निवासस्थानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. पीठासीन अधिकारी मंगेश मोहिते यांना नगरसचिव प्रदीप वडुरकर व नंदकिशोर पवार यांनी सहकार्य केले. गणक म्हणून विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण व जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून नाव फायनल
सभापतिपदाचा उमेदवार निश्चिती करण्यासाठी पालकमंत्री , आमदार, शहराध्यक्ष व संघटन सचिवांची कोअर कमिटी गठित करण्यात आली. गतवेळचे प्रमुख दावेदार व आ. देशमुखांचे निकटतम बाळासाहेब भुयारांसह विजय वानखडे, राजेश पड्डा, राधा कुरील, चेतन गावंडे यांच्या नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये भाषावाद, महिलांचा सन्मान आदी विषयदेखील चर्चेत आले. अखेरच्या क्षणी चेतन गावंडे व बाळासाहेब भुयार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांत स्वभावाचे ज्येष्ठ व सर्वांनाच चालणारे बाळासाहेब भुयार यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्याची चर्चा महापालिका परिघात सुरू आहे.
जे बोलणार, तेच करणार
आगामी दोन निवडणुकांच्या आचारसंहितांमध्ये बराच कालावधी जाणार आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत सीमित आहेत. त्यातूनच खर्च करण्याचे काम जिकरीचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करू. सरकार आमचेच आहे. त्यामुळे अधिकाधिक निधी खेचून आणू. बाजार परवाना विभाग, मालमत्ता कर वसुलीकडे विशेष लक्ष देणार आहे. आयुक्तांच्या सहकार्याने अनावश्यक खर्चात कपात करून महापालिकेच्या उत्पन्नवाढीकडे कल राहणार आहे. मी जे बोलतो, तेच करून दाखविणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सभापती भुयार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.