अमरावती : १४ तालुक्यात सुरू होणार 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'
By जितेंद्र दखने | Published: April 8, 2023 07:11 PM2023-04-08T19:11:33+5:302023-04-08T19:12:14+5:30
जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये हे दवाखाने सुरू राहणार आहेत.
अमरावती - सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ तालुक्यांत १ मे 'महाराष्ट्र दिन'पासून या दवाखान्यांना सुरुवात होणार आहे. या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
याव्यतिरिक्त एक्स-रे, सोनोग्राफी, आदी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवादेखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये हे दवाखाने सुरू राहणार आहेत. एमबीबीएस डॉक्टरांसह परिचारिका, स्वच्छता कर्मचारी सेवेत राहणार आहेत. आपला दवाखान्यातील ओपीडी ते साधारणत: सकाळच्याच सत्रात सुरू राहील, अशी माहिती आहे. हे दवाखाने सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी जागा व परिसरही जवळपास निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे डॉक्टर, परिचारिका, स्टाफ नर्स, अटेंडंट, आदींची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत सीईओ अविश्यांत पंडा व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले म्हणाले, 'येत्या १ मेपासून जिल्ह्याच्या १४ तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, औषधीसाठा, मनुष्यबळ, आदींबाबतचे नियोजन सुरू आहे. या दवाखान्यामुळे आरोग्य व्यवस्थेला एक प्रकारचा बूस्टर मिळणार आहे.
काय आहे ‘आपला दवाखाना’ योजना?
सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप, सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार वस्तीनजीक ‘आपला दवाखाना’ असावा हे या मागील उद्देश आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या आजारासाठी रुग्णालयात यावं लागतं. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतोच शिवाय प्रवासाचा खर्च होतो. या गैरसोयी दूर होणार आहेत.