बालभारतीने ४२५ मेट्रीक टन पुस्तके रद्दीत काढलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:18 AM2021-08-18T04:18:30+5:302021-08-18T04:18:30+5:30
फोटो १७एएमपीएच०२ कॅप्शन : छापलेली बालभारती पुसक्तांचा हा ढीग. गणेश वासनिक अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद ...
फोटो १७एएमपीएच०२ कॅप्शन : छापलेली बालभारती पुसक्तांचा हा ढीग.
गणेश वासनिक
अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. परिणामी बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तके गोदामात पडून आहे. राज्यभरात ४२५ मेट्रिक टन पस्तके रद्दीत विक्रीला काढण्यासाठी पेपर मिल्सकडून ई- निविदा मागविल्या आहेत.
पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल येथील बालभारतीच्या विभागीय गोदामात अभ्यासक्रम बंद होऊन दोन वर्षे झालीत आणि ही पुस्तके वापरायोग्य नाही, अशा शालेय पुस्तकांची रद्दीत विक्री करण्यात येणार आहे. पुणे येथील बालभारतीच्या संचालक कार्यालयातून ४२५ मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विक्रीसाठी ई-निविदा काढण्यात आली आहे. पेपर मिल्सकडून निविदा आल्यानंतर शालेय पुस्तके टनाप्रमाणे मोजून दिले जातील, अशी माहिती आहे. गतवर्षी मार्चपासून शाळा बंद असताना बालभारतीने अनावश्यक पुस्तके का छापलीत, हासुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरित केली जातात. शाळांच्या मागणीनुसार शालेय पुस्तकांचा पुरवठा केला जातो. ही पुस्तके विक्रीसाठी नाहीत. त्यावर तसा उल्लेखही असतो. शाळा बंद असताना विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यात शिक्षण विभाग माघारल्याचे चित्र आहे. त्यामुळे बालभारतीने पुस्तके छापून ती तशीच पडून असल्याने आता रद्दीत विकण्याचा प्रसंग ओढावला आहे.
-----------------
अमरावती विभागात शालेय पुस्तकांच्या विक्रीत घट
कोरोनामुळे अमरावती विभागातील अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यात शालेय पुस्तकांची विक्री घटली आहे. एरव्ही दरवर्षी २० कोटी रुपयांपर्यंत पुस्तके विक्री होत असताना गतवर्षी, यंदादेखील ५ कोटींवर विक्री स्थिरावली आहे. विक्रेते, बुक स्टॉल धारकांच्या ऑनलाईन मागणीनुसार विक्रीसाठी उपलब्ध शालेय पुस्तके ही १५ टक्के कमीशननुसार विक्री केले जातात.
-------------------
रद्दीतील शालेय पुस्तकांबाबत ई-निविदा ही पुणे येथील संचालकांकडून काढण्यात येतात. पुस्तके छापली पण अभ्यासक्रम बदलल्याने ती वापरायोग्य नाही, अशाच पुस्तकांची रद्दी पेपर मिलला दिली जाते. तूर्त रद्दीबाबत वरिष्ठांकडून गाईडलाईन आल्या नाहीत.
- रमेश गुंडरे, भांडार अधीक्षक, बालभारती, अमरावती