गवळीपुऱ्यात बिलकीस बानो विजयी
By Admin | Published: November 3, 2015 01:53 AM2015-11-03T01:53:34+5:302015-11-03T01:53:34+5:30
महापालिका प्रभाग क्र. २६ गवळीपुरा येथे सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत
अमरावती : महापालिका प्रभाग क्र. २६ गवळीपुरा येथे सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार बिलकीस बानो हमजा खाँ विजयी झाल्या आहेत. त्यांना १८१२ मते मिळालीत. या पोटनिवडणुकीवरून मुस्लीमबहुल भागात काही दिवसांपासून तापलेले वातावरण सोमवारी शमले, हे विशेष. दरम्यान निवडणूक निकालानंतर ‘पतंग तनली’ अशी चर्चा परिसरात सुरू होती.
नेहरु मैदानातील महापालिका शाळेत सोमवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार बिलकीस बानो आघाडीवर होत्या. ही आघाडी त्यांनी अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवली. पोटनिवडणुकीत एकूण चार महिला उमेदवार रिंगणात होत्या. यात अपक्ष बिलकीस बानो हमजा खॉ यांना १८१२ मते, अपक्ष उमेदवार आसिया अंजुम वहीद खान यांना १५०९, काँग्रेसच्या शेख खातून बी शेख हातम यांना ८८२ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख शाहीन परवीन शे. करीम यांना १८३ मते मिळालीत. निवडणुकीत २२ मतदारांनी नकारात्मक (नोटा) मतदान केले. ८ हजार ३७५ पैकी ४ हजार ४०८ मतदारांनी मतदानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. अवघ्या दीड तासांत मतमोजणी प्रक्रिया आटोपली.
ढोल ताशे, आतषबाजीला फाटा
४रविवारी मतमोजणी सुरू होताच अपक्ष उमेदवार बिलकीस बानो विजयी होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यांच्या त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. मात्र, साबणपुऱ्यातील युवकाची रविवारी उशिरा हत्या झाल्याने विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी ढोले-ताशे, फटाक्यांच्या आतषबाजीला फाटा देत साध्या पध्दतीने विजय साजरा केला.
प्रस्थापित पक्षांसाठी वेगळा संदेश
४सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून गवळीपुरा प्रभागातील पोटनिवडणुकीला महत्त्व आले होते. त्याच अनुषंगाने नेते प्रचाराला लागले होते. निवडणुकीदरम्यान अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असतानाच अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने राजकीय पक्षांपर्यंत वेगळा ‘संदेश’ गेला आहे.