अचलपूर मतदारसंघात बळीराजा सन्मान योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:11 AM2021-04-05T04:11:23+5:302021-04-05T04:11:23+5:30

चांदूर बाजार : अचलपूर मतदारसंघातील पांदण रस्ते, वृक्षलागवड व नाला खोलीकरण या महत्त्वपूर्ण बाबींना तीन महिन्यांत ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार ...

Baliraja Sanman Yojana in Achalpur constituency | अचलपूर मतदारसंघात बळीराजा सन्मान योजना

अचलपूर मतदारसंघात बळीराजा सन्मान योजना

googlenewsNext

चांदूर बाजार : अचलपूर मतदारसंघातील पांदण रस्ते, वृक्षलागवड व नाला खोलीकरण या महत्त्वपूर्ण बाबींना तीन महिन्यांत ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार करून मार्गी लावा. बळीराजाच्या बळकटीसाठी तिन्ही कामे पूर्ण करून अचलपूर मतदारसंघात बळीराजा सन्मान योजना राबवा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.

बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार धीरज स्थूल, अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव उपस्थित होते. या आढावा बैठकीत अचलपूर मतदारसंघातील २६८ पांदण रस्त्यांच्या कामांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये ‘अ’ गटातील ४२ कामांत ४३.५० किलोमीटर पांदण रस्त्यांचे काम होणार आहे. ‘ब’ गटातील १६८ कामांत २४३.४० किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे. ‘क’ गटातील ५६ कामांत १४४ किलोमीटर रस्त्याचे काम केले जाणार आहे. गाव जोडणारा, वस्ती जोडणारा प्रत्येक रस्ता हा पांदण रस्ता म्हणून तयार करा. यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे.

ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ई-क्लास जमिनीवर फळझाडे लावून ग्रामपंचायतला उत्पन्नाचा स्रोत लाभेल. यात संत्री, लिंबू, मोसंबी, सीताफळाची रोपे लावण्याचे नियोजन करावे. कालव्याच्या बांधावरसुद्धा झाडे लावण्यात यावी. यांसोबतच ‘जागा मिळेल तिथे रोपे, रस्ता असेल तिथे कुदळी’ तयार ठेवण्याच्या सूचना राज्यमंत्री कडू यांनी दिल्या. मतदारसंघात ११० हेक्टरमध्ये ११ ते १२ हजार झाडे लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मतदारसंघातील नाला खोलीकरणाची कामेही मंजूर करण्यात आली. बळीराजा सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतला आमदार निधीतून सात लाख, पाच लाख, तीन लाख अशी तीन पारितोषिके मिळतील. हा उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतने योग्यरीतीने राबवावा, अशा सूचना गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरगडे यांना देण्यात आल्या.

आढावा बैठकीला विस्तार अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सेवक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मिलिंद भेंडे, दीपक भोंगाडे, संजय गोमकाळे, उमेश कपाले, अण्णा खापरेसह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Baliraja Sanman Yojana in Achalpur constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.