अमरावतीच्या बांबू प्लांटमध्ये विमानाने आली रोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 06:18 PM2019-03-02T18:18:52+5:302019-03-02T18:19:06+5:30
अमरावती येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.
- इंदल चव्हाण
अमरावती - येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.
अमरावती येथील वडाळी तलावानजीक वनविभागांतर्गत बांबू गार्डन नावारूपास आले आहे. तेथे विविध प्रजातीचे बांबू विकसित करण्यात आले आहेत. येथे वनपाल सैयद सलीम यांनी केरळ राज्यातील २२ प्रजातीच्या बांबूंची रोपे आणण्याचा निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात घेतला. यामध्ये बांबूसा डिस्सिम्यूलेटर, बांबूसा टेक्सटिलिस, सेफालोस्टाचाइम फुचसिएनम, सेफालोस्टाचाइम युनानिकस, डायनोचलोआ सॅचेलांदी, गिगांटोचलोआ मांगोने, गिगांटचलोआ व्हर्टिसिल्लाटा, मेलोकातमस कॉम्पॅक्टीफ्लोरस, आॅचलांद्रा तालबोती, आॅचलांद्रा विट्टी, आॅचलांद्रा सेटिगेरा, आॅचलांद्रा ट्राव्हंसोरिया हिरसुता, फिलॉस्ताचिस सल्फ्युरिया, सेउडॉक्सीटेनांथेरा बौर्डीलोलणी, ससा फॉर्क्यी व्हेरिएगेटेड, बांबूसा ब्रोमिश, डेंड्रोकालमस एण्डोमनिका, फिलॉस्टॅचीस व्हेरिगेटेड, व्हेरिगेटेड कलरचेंज या प्रजातीचे बांबूंची मातीविरहित रोपे जवळपास १ क्विंटल वजनाची विमानाने आणावी लागली. ती जिवंत राहावी, यासाठी कमी वेळेत आणणे गरजेचे असल्याने विमानाचा पर्याय निवडल्याचे वनपाल सैय्यद सलीम अहमद यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
आर्द्रतेसाठी उपयुक्त
बांबू ही गवताची जात आहे. बांबूची पाने लांब आणि निमुळत्या आकाराची असतात. पाने गळाल्यानंतर जमिनीवर आछादतात. पावसाचे पाणी थेट जमिनीत न शिरता पाना-पानांतून जमिनीत मुरते. जमिनीत ओल असताना वरून पाने असल्याने उन्हाचा थेट जमिनीवर प्रवेश होत नसल्याने त्या भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. त्याचा इतर पिकांनाही फायदा होतो. त्यामुळे शेतकºयांनी नापिकीच्या भागात बांबूची लागवड केल्यास त्याचा लाभ निश्चित होऊ शकेल.
खारपाणपट्ट्यात बांबूची लागवड फायद्याची
मध्यभारतातच खारपाणपट्ट्याची जमीन असून, क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते पिकांसाठी अपायकारक ठरते. त्यामुळे अशा जमिनीत भरघोस उत्पन्न मिळू शकत नाही. यावर उपाययोजना म्हणून अशा भागात बांबूची शेती केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. तसेच शेताला कुंपण घालण्यासही बांबू उपयुक्त ठरू शकते. बांधावर काटेरी बांबूची लागवड केल्यास कुंपणाचा खर्चही वाचेल आणि बांधापासूनदेखील शेतकºयांना उत्पन्न मिळेल. ही प्रणाली काही शेतकºयांच्या लक्षात आल्याने आता याकडे शेतकºयांचा कल वाढीस लागला आहे.
परराज्यातून आणलेला बांबू येथील वातावरणाशी समरस बनविणे, त्याला महाराष्ट्रीय प्रजातीत रुपांतरण करून तो शेतकºयांना लागवडीसाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा शेतकºयांना लाभ निश्चित होईल.
- सैय्यद सलीम अहमद, वनपाल, वडाळी मध्यवती रोपवाटिका.