जिल्ह्यात लेझर लाईटवर बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय
By प्रदीप भाकरे | Published: September 16, 2024 06:08 PM2024-09-16T18:08:30+5:302024-09-16T18:10:35+5:30
पोलीस अधीक्षकांचे आदेश : गणेश विसर्जन, ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये बीएएनएसअन्वये अधिसुचना
अमरावती: गणेश विसर्जन मिरवणुक व ईद ए मिलादच्या जुलूसावेळी ध्वनिक्षेपकावर लावण्यात येणाऱ्या लेझर बीम लाइटवर पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी लेझर बीम लाइट लावल्यास, कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम-१६३(१) अन्वये) तशी अधिसुचनाच त्यांनी पारित केली आहे.
जिल्हयात सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळ्या तारखेला मोठया प्रमाणात विसर्जन मिरवणुकांचे आयोजन केले जात आहे. या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यावर्षी कोल्हापुर जिल्हयातील उचगाव परिसरात मणेरमळा येथे गणेश आगमनावेळी मिरवणूक बघण्याकरीता आलेल्या भाविकांच्या डोळयावर लेझर लाईट पडल्याने त्या व्यक्तीच्या डोळयाचा पडदा तसेच बुबुळाला ईजा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापुर्वी गतवर्षी यवतमाळ जिल्यातील उमरखेड येथे ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या नगर परिषद व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या मध्यभागी शिवराजमुद्रा व शिवाजी महाराज यांचे अर्धपुतळयावर डीजेवरुन लेझरच्या सहाय्याने मिनार व मशिदीचे चित्र तयार करुन हिंदु धर्माच्या धार्मिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होईल, अशी क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने तेथे तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्याअनुषंगाने एसपी विशाल आनंद यांनी लेझर लाईटवर बंदी घातली आहे.
२१ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंध
जिल्हयात २१ सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन होणार आहे. तर, १६ ते २१ सप्टेंबर या कालावधीमध्ये ईद ए मिलाद सण मोठया उत्साहाने साजरा केला जातो. त्या दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळाकडून व ईद ए मिलाद कमिटीकडुन मोठया प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केल्या जाते. या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर ते मोठया प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ वे कलम १६३(१) नुसार जिल्हयात १६ ते २१ सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
"१६ ते २१ सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सव व ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तशी अधिसुचना रविवारी काढली."
- विशाल आनंद, पोलीस अधीक्षक