अमरावती शहरात ऑनलाईन शस्त्र खरेदीस प्रतिबंध
By प्रदीप भाकरे | Published: October 11, 2024 06:49 PM2024-10-11T18:49:57+5:302024-10-11T18:50:23+5:30
पोलीस आयुक्तांचा आदेश : गुन्ह्यात चायना चाकुचा वापर वाढल्याने कंपनींनाही नोटीस
प्रदीप भाकरे
अमरावती : शहरात ऑनलाईन शस्त्र खरेदीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ११ ऑक्टोबर रोजी तो आदेश काढला असून, तो पुढील ६० दिवसांकरीता लागू असेल. शहरात अलिकडे झालेल्या खुनाच्या सलग तीन घटनांमध्ये चायना चाकू वापरला गेला. त्यापुर्वी राजापेठ हद्दीत सलग झालेल्या दोन खुनात देखील चायना चाकू वापरला गेला. त्यापाश्वभूमिवर तो प्रतिबंध आदेश काढण्यात आला आहे.
अलिकडे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शॉपक्लुज डॉट कॉम या कंपन्या आपल्या ई कॉमर्स प्लॅटफार्महून धारधार शस्त्रे, जी गुन्हयांमध्ये वापरले जाऊ शकतात, अशा शस्त्रांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शॉपक्लुज डॉट कॉम या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्महून तिक्ष्ण धार असलेले प्राणघातक शस्त्र ज्याच्या पात्याची लांबी नऊ इंचापेक्षा जास्त किंवा ज्याच्या पात्याची रुंदी २ इंचापेक्षा जास्त असेल, ज्याचे बाळगणे हे भारतीय हत्यार कायदा कलम ४ सहकलम २५ अन्वये दखलपात्र गुन्हा होत असल्याने अशा शस्त्र विक्रीवर अमरावती शहरात बंदी घालण्यात आली आहे.
यांची मागितली माहिती
ज्यांची लांबी नऊ इंचापेक्षा कमी व रुंदी दोन इंचापेक्षा कमी असलेल्या शस्त्रांची ऑनलाइन खरेदी करण्या-या अमरावती शहरातील ग्राहकांची विस्तृत तपशीलासह माहिती अमरावती शहर पोलिसांना वेळोवेळी पुरविण्याबाबत देखील संबंधित इ कॉमर्स कंपन्यांना आदेशित करण्यात आले आहे.
शस्त्रखरेदी करणा-यांची माहिती मागवली
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून शस्त्रखरेदी करणा-या शहरातील व्यक्तीचे नाव, पत्ता, शस्त्राचा प्रकार, फोटो व इतर आवश्यक माहिती
मिळवून ती सादर करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. शहरातील काही गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी ऑनलाईन शस्त्र विकत घेतल्याचे आढळले. अशा शस्त्र विक्रीमुळे शहरात गुन्हेगारांना घरपोच शस्त्र उपलब्ध होत असून, गुन्हेगारीस पाठबळ मिळू शकते. त्यामुळे हा आदेश पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आला.
"सर्व ऑनलाईन शस्त्रांची विक्री करणा-या कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. शहरात ऑनलाईन शस्त्र खरेदीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. आयुक्तालयातील दहाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो आदेश लागू राहिल. तसेच पोलिसांतर्फे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरूध्द मोहिम हाती घेण्यात आली आहे."
- नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त