‘प्लास्टिक’च्या राष्ट्रध्वजावर यंदाही सक्तीची बंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 03:54 PM2019-01-16T15:54:16+5:302019-01-16T15:57:10+5:30
‘प्लास्टिक’च्या राष्ट्रध्वजावर यंदाही सक्तीची बंदी लादण्यात आली असून हा नियम तोडणाºयांविरूद्ध कठोर कारवाईचे सुतोवाच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारी रोजी विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी लहान आकारातील कागदी किंवा प्लास्टिकपासून बनविण्यात आलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसºया दिवशी हे ध्वज इतस्तत: टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो प्रकर्षाने टाळण्याकरिता ‘प्लास्टिक’च्या राष्ट्रध्वजावर यंदाही सक्तीची बंदी लादण्यात आली असून हा नियम तोडणाºयांविरूद्ध कठोर कारवाईचे सुतोवाच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे भारतातील प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान व विटंबना करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे प्लास्टिकपासून तयार झालेले राष्ट्रध्वज वापरूच नयेत अथवा कुणी ते वापरून इतस्तत: फेकून दिल्यास असे उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण, खराब झालेले किंवा रस्त्यावर, मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेकडे सुपूर्द करावेत. यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पालक व सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.