बीटी बियाणांच्या विक्रीला १ जूनपर्यंत प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:05 AM2021-05-04T04:05:40+5:302021-05-04T04:05:40+5:30
अमरावती : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवारांमध्ये हंगामपूर्व कपाशी लागवड झाल्यास गुलाबी बोंडअळीचा ...
अमरावती : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवारांमध्ये हंगामपूर्व कपाशी लागवड झाल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. तसे आदेश ३० एप्रिलला बजावले आहेत.
जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा सर्वाधिक प्रकोप खरीप २०१७ मध्ये झाला होता. त्यानंतर कृषी विभागाद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यामुळे सन २०२० मध्ये प्रादुर्भाव कमी आढळून आला. त्यातुलनेत ऑगस्टपश्चात दोन महिने झालेल्या परतीच्या पावसामुळे कपाशीवर बोंडसडचा जास्त प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा उपद्रव होऊ नये, याकरिता आतापासूनच उपाययोजना प्रस्तावित केल्या जात आहेत.
कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगण्यात आले. कपाशीची हंगामपूर्व पेरणी झाल्यास बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होणार नाही. याउलट पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोंडअळीचा जीवनक्रम खंडित करण्याच्या प्रमुख उपायांपैकी एक प्रभावी उपाययोजना म्हणून यंदा हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांना हंगामपूर्व बियाणेच उपलब्ध होऊ न दिल्यास हंगामपूर्व लागवड टाळता येऊ शकते. त्यामुळेच १ जूनपर्यंत बीटी बियाणांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेता यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियमात २००९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
पाॅइंटर
असे आहेत निर्देश
उत्पादक ते कंपनी वितरक : १० मे पासून पुढे
वितरक ते किरकोळ विक्रेता : १५ मे पासून पुढे
किरकोळ विक्रेता ते शेतकरी : १ जूनपासून पुढे
बॉक्स
किमान पाच हजार हेक्टरमध्ये हंगामपूर्व कपाशी
जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व कपाशीची किमान पाच हजार हेक्टरमध्ये लागवड होते, ती यंदाच्या हंगामात होऊ नये यासाठी कृषी विभागाद्वारे खबरदारी घेतली जात आहे. यंदा भूजल पातळी समाधानकारक असल्याने विहिरीतील पाण्याची पातळीदेखील चांगली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी १ जूननंतर पेरणीच्या तयारीत आहेत.
बॉक्स
यंदा १२.५८ लाख बियाणे पाकिटांची मागणी
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात किमान २,५१,४५२ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत सहा हजार हेक्टरने जास्त आहे. यासाठी यंदा बीजी-२ च्या किमान १२,५७,७१० पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये ४५० ग्रॅमच्या एका पाकिटाची किंमत ७६७ रुपये केंद्रीय कृषी मंत्रालयाने निश्चित केली आहे. यामध्ये १२० ग्रॅम रेफ्युजी बियाणे राहणार आहे.