‘एडीफाय’वर बंदची तलवार
By admin | Published: June 18, 2016 12:03 AM2016-06-18T00:03:19+5:302016-06-18T00:03:19+5:30
देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरास्थित 'एडीफाय' शाळेवर बंदची टांगती तलवार आहे.
संचालकाविरुद्ध तक्रार : प्राथमिक शिक्षणाधिकारीकडून चौकशी
अमरावती : देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरास्थित 'एडीफाय' शाळेवर बंदची टांगती तलवार आहे. या शाळेला राज्याच्या शिक्षण विभागाकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याचे प्राथमिक चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी एडीफाय शाळेमध्ये जाऊन चौकशी केली. दरम्यान पालक रवी पाटील यांनी या शिक्षण संस्थेच्या संचालकाविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एडीफाय शाळा अनधिकृत असल्याच्या मुद्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी पानझाडे शुक्रवारी सकाळी कठोरास्थित शाळेमध्ये दाखल झाले. त्यांनी तक्रारकर्ते पालक रवी पाटील यांनाही बोलावून घेतले व तक्रारकर्त्याच्या समोरच एडीफाय व्यवस्थापनाची उलटतपासणी घेतली. चौकशीदरम्यान एडीफायला शिक्षण विभागाने कुठलीही मंजुरी दिली नाही. मात्र, त्यानंतरही पालकांकडून हजारो रुपये उकळत असल्याचे स्पष्ट झाले. शाळा सुरूच झाली नसल्याचा दावा संचालकांकडून करण्यात आला होता. मात्र, पालकांनी रक्कम भरल्याची पावती समोर करताच संचालकांची बोबडी वळली. स्थानिक व्यवस्थापन मंजुरी आणि मान्यतेसंदर्भातील कुठलाही दस्तऐवज शिक्षणाधिकाऱ्यांना दाखवू शकले नाहीत.