ग्रामपंचायत निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:02 AM2021-01-05T04:02:28+5:302021-01-05T04:02:28+5:30

पॅनेलला ठरणार घातक : राजकीय वारसा जपण्याकरिता ग्रामनेते झाले सक्रिय ! वरूड : उमेदवारी अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये ...

Bandobas also prevailed in the Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला

ग्रामपंचायत निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला

googlenewsNext

पॅनेलला ठरणार घातक : राजकीय वारसा जपण्याकरिता ग्रामनेते झाले सक्रिय !

वरूड : उमेदवारी अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामनेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याकरिता महाविकास आघाडीला रामराम ठोकला आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत, तर काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याने पुन्हा मतदारांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे या स्थानिक स्तरावरील निवडणुकीतही बंडोबांचा बोलबाला राहणार असल्याचे संकेत आहेत.

मतदान १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत, तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी ४५ हजार २४२ पुरुष, तर ४१ हजार ८२१ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १३९ प्रभागांकरिता १५५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. त्याअनुषंगाने ग्रामीण राजकारण तापायला सुरुवात झाली असली तरी सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढले जाणार असल्याने उत्साह घटला आहे.

मतभेद चव्हाट्यावर

तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यात सत्ता काबीज करण्यास यश मिळविले असले तरी मात्र ग्रामीण राजकारणात हेवेदावे, मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. गावनेत्यांना एकमेकांचे वर्चस्व सहन होत नाही. यामुळे काहींनी बंडखोर उमेदवार उभे केले आहेत. पॅनेलआडून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे समीकरण असले तरी काँग्रेसने वेगळी चूल मांडली आहे. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि राष्ट्रवादी युती आहे. एकीकडे केवळ सत्ता काबीज करण्याकरिता एकत्र येऊन मतदारांची दिशाभूल करणे आणि गावपातळीवरच्या राजकारणात वैयक्तिक मत मागणे हा जगावेगळा कारभार राजकारण्यांनी सुरु केल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

चुलीपासूनच्या राजकारणाला सुरुवात

गावपातळीवरचे नेते सक्रिय होऊन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काही गावात सख्खे भाऊ, तर कुठे उमेदवार मिळाला नाही म्हणून घरी काम करणाऱ्या माणसाला निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीवर आपले राज्य हवे म्हणून सरपंच घरचाच असावा, याकरिता काही लोकप्रतिनिधींनी आपल्या जोडीदारांनासुद्धा निवडणुकीत उभे केल्याची चर्चा आहे.

भाजपचे युवा नेते भूमिगत?

भाजपचे युवा नेते आपले उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवून पक्षाला घरचा आहेर दिला आणि भूमिगत झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या राजकीय मनसुब्यावर पाणी फेरले जाणार आहेत. यामुळे वरूड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगणार असून, जिल्हास्तरावर एकाच राजकीय पक्षासाठी काम करणारे दोन गावपुढारी एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. त्यातच सदस्य व सरपंचपदाकरिता सातवा वर्ग उत्तीर्ण असणे अनिवार्य केल्याने अनेक जुन्या जाणत्यांना गावातील राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ आली आहे.

------------------------------

Web Title: Bandobas also prevailed in the Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.