घुईखेड येथे बेंडोजी बाबा प्रकटदिन उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:25 AM2018-04-13T01:25:32+5:302018-04-13T01:25:32+5:30
तेराव्या शतकातील संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त समाधीचे दर्शन व महाप्रसादासाठी बुधवारी हजारो भाविक भक्तांची गर्दी घुईखेड येथील संस्थानात उसळली होती. चांदूर रेल्वेहून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड येथे संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिन पर्वाला ३ एप्रिलपासून सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : तेराव्या शतकातील संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त समाधीचे दर्शन व महाप्रसादासाठी बुधवारी हजारो भाविक भक्तांची गर्दी घुईखेड येथील संस्थानात उसळली होती.
चांदूर रेल्वेहून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड येथे संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिन पर्वाला ३ एप्रिलपासून सुरुवात झाली. ११ एप्रिलला काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता झाली. संत बेंडोजी महाराज यांनी इ.स. १३३७ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली. तेव्हापासून दर्शन सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. काही दिवसांपूर्वीच या सोहळ्याला ६८० वर्षे पूर्ण झाली.
घुईखेड येथे १० एप्रिल रोजी सकाळी सर्वप्रथम संत बेंडोजी बाबा ग्रंथसमाप्ती व पालकीची मिरवणूक काढण्यात आली. ११ एप्रिलला सकाळी आळंदी येथील ॉ उमेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन व भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. यावेळी अन्नदाते अ.भा. ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण शर्मा व पत्नी नेहा शर्मा यांचा शाल-श्रीफळ देऊन संस्थानतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला. आरतीनंतर मंदिर परिसरात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आयोजनाकरिता बेंडोजी बाबा संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, सचिव बाळासाहेब देशमुख, कोषाध्यक्ष दिनकर घुईखेडकर, सदस्य प्रवीण घुईखेडकर, विजय घुईखेडकर, विवेक घुईखेडकर, शशिकांत चौधरी यांच्यासह गावातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.
देहूत गायिली जाते आरती
संत बेंडोजी महाराजांचा इतिहास प्राचीन असून, संस्थानने सन १३३७ साली तयार केलेला भालदार व चोपदारांचा बिल्ला आजही विश्वस्तांजवळ असून, तो प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे. त्यांचे विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो अनुयायी आहेत. देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरात आजही दररोज बेंडोजी महाराजांची काकड आरती गायिली जाते.