बांगलादेशाने वाढविले संत्र्यावरील आयात शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:12+5:302021-06-22T04:10:12+5:30
संत्राउत्पादक हवालदिल : केंद्रीय मंत्री गडकरी, पीयूष गोयल यांच्याकडे साकडे अमरावती : बांगलादेश सरकारने संत्र्यावरील आयात शुल्क वाढविल्यामुळे मो, ...
संत्राउत्पादक हवालदिल : केंद्रीय मंत्री गडकरी, पीयूष गोयल यांच्याकडे साकडे
अमरावती : बांगलादेश सरकारने संत्र्यावरील आयात शुल्क वाढविल्यामुळे मो, वरूड, चांदूरबाजार व नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यातून जाणारी संत्री यावेळी कमी प्रमाणात गेली. पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी केंद्र सरकारने यात पुढाकार घेऊन शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी संत्री उत्पादक शेतकऱ्यांकडून समोर आली आहे. याबाबत केंद्रीत मंत्री नितीन गडकरी व पियुष गोयल यांच्याकडे मध्यस्थीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
नागपूर, अमरावती विभागातील मोठ्या प्रमाणात संत्री बांगलादेशमध्ये निर्यात होत होती. तेथील सरकारने आधी २० टन ट्रकवर ४० हजार रुपये आयातशुल्क लावले. परंतु, काही वर्षांपूर्वी त्यात तब्बल तेरा पट वाढ करून पाच लाख ४० हजार रुपये केले. यंदा बांगला देशाच्या अर्थसंकल्पात पूर्वीच्या ३१ रुपये प्रतिकिलोने वाढ करून ३८ रुपये ९० पैसे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे २५ मे. टन संत्राफळावर किमान दोन लाखांची वाढ होणार आहे. त्यामुळे संत्र्याची मागणी घटली व निर्यातदेखील कमी झाली. बांगलादेशमध्ये चीन, भूतान, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया आदी देशातून आयात होणाऱ्या संत्र्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात शुल्क नाही. त्यामुळे केंद्र शासनाने याविषयीची दखल घ्यावी व आवश्यक तो पर्याय काढण्याची मागणी इंडो-बांग्ला संत्रा बागायतदार संघटनेद्वारा करण्यात आली.