बँकेच्या रोखपाल महिलेचा रोकड घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:04 AM2021-08-02T04:04:54+5:302021-08-02T04:04:54+5:30
चांदूर रेल्वे : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चांदूर रेल्वे शाखेत रोखपाल महिलेने आर्थिक व्यवहाराची वेळ संपण्याच्या आधी दुपारी ३.४५ ...
चांदूर रेल्वे : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चांदूर रेल्वे शाखेत रोखपाल महिलेने आर्थिक व्यवहाराची वेळ संपण्याच्या आधी दुपारी ३.४५ वाजता कॅश काऊंटर बंद केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.यावेळी उपस्थित बँक ग्राहकांनी विनंती केल्यानंतही रोखपालांनी रोकड स्वीकारण्यात नकार दिल्याने अनेकांना मात्र आर्थिक व्यवहार न करताच परत जावे लागले.
चांदूर रेल्वे येथील आठवडी बाजार परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाची कामकाजची वेळ सकाळी १०.३० ते ४ अशी आहे. शुक्रवारी दुपारी अनेक ग्राहक त्यांचे आर्थिक व्यवहारासाठी कॅश काऊंटरसमोर रांगेत लागले होते. दुपारी ३.४५ वाजता अनेक बँक ग्राहक रांगेत असताना बँक रोखपाल महिलेने कॅश काऊंटर बंद केले. उपस्थित ग्राहकांनी अद्याप १५ मिनिटाचा वेळ असल्याने व्यवहार पूर्ण करा, अशी विनवणी केली. मात्र, त्यांचा नकार कायम होता. ग्राहकांनी शाखा व्यवस्थापकाकडे लेखी तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी रवींद्र मेंढे, इम्रान पठाण, विलास डोळस यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
------------माझी कुठेही तक्रार करा
माझी कुठेही तक्रार करा, असे बँक ग्राहकांना महिला रोखपालाने स्वीकारले. त्यामुळे उपस्थित ग्राहकांनी शाखा व्यवस्थापकाकडे धाव घेतली. बँक व्यवस्थापक स्वत: रोखपालांच्या केबिनमध्ये आले आणि त्यांनी नागरिकांकडून रोडक स्वीकारण्याचे बजावले. मात्र, त्यांनाही त्या जुमानल्या नाहीत.
-----------
शुक्रवारी दुपारी ३.४० वाजता बचतगटाची रक्कम भरण्यासाठी बँकेत गेलो होतो. त्यावेळी कॅश काऊंटर बंद झाले होते. मी रोखपालांना विनंती केली. त्यावर त्यांनी व्यवहार करण्यास नकार दिला आणि तुम्ही कोणाकडेही तक्रार करा, असे म्हटले.
- रवींद्र मेंढे, चांदूर रेल्वे