कॉपी रोखण्यासाठी अमरावती विद्यापीठात आता प्रश्नावलींची बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:37 AM2019-05-28T11:37:12+5:302019-05-28T11:37:32+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेत समानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी प्रश्नावलींची बँक तयार करण्याचे पाऊल उचलले आहे. त्याकरिता प्रश्नावली निर्माण समितीचे गठन करण्यात आले असून, तज्ञ्जांकडून एकाच वेळी विषयांचे ५०० प्रश्नावली तयार केली केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेत समानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी प्रश्नावलींची बँक तयार करण्याचे पाऊल उचलले आहे. त्याकरिता प्रश्नावली निर्माण समितीचे गठन करण्यात आले असून, तज्ञ्जांकडून एकाच वेळी विषयांचे ५०० प्रश्नावली तयार केली केली जाणार आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांना रॅण्डम पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केंद्रावर आॅनलाईन प्रश्न पाठविले जातील.
परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाचे हे पाऊल भविष्यात महत्त्वाचे ठरणारे आहे. नीट, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे स्वरूप समोर ठेवून प्रश्नावलींची बँक तयार केली जाणार आहे. यात ५० गुणांची लेखी परीक्षा, ३० गुण आॅब्जेक्टिव्ह आणि २० इंटरनल गुणांचा समावेश असेल. प्रश्नावलींची बँक असल्यास लिकेजेसला वाव असणार नाही, असा दावा विद्यापीठाने केला आहे. एकदा बँक विकसित झाली की, यात दरवर्षी १० टक्के गुण नव्याने समाविष्ट केले जातील. नव्या प्रश्नावलीत जुने, नवीन बाबीचा समावेश केला जाईल. त्यामुळे परीक्षा केंद्रावर वर्गखोलीत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप भिन्न असणार आहे. रॅण्डम पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रश्नपत्रिका हाती मिळेल. ही प्रश्नपत्रिका समान असणार नाही. त्यामुळे परीक्षेत सुसूत्रता आणि समानता येण्याचे हे चिन्हे मानले जात आहे. एका विषयाच्या पेपरचे तीन सेट तयार होतील. त्यानंतर सॉफ्टवेअर हे पेपर जनरेट करणार आहे. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांना कोणती प्रश्नावली मिळाली हे कळू शकणार नाही. या नव्या प्रयोगामुळे दरवर्षी अमरावती विद्यापीठाला प्रश्नपत्रिकांवर होणाऱ्या अवाजवी खर्चाला आळा बसविणे शक्यक होणार आहे. अमरावती विद्यापीठासाठी प्रश्नावलींची बँक हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
समितीचे काम सुरू
अमरावती विद्यापीठाचे कुुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या निर्देशानुसार प्रश्नावलींची बँक तयार करण्यासाठी गठित समितीचे काम सुरू झाले आहे. नीट, एमपीएससी, यूपीएससी या पॅटर्ननुसार भविष्यात विद्यापीठाच्या नियमित, सेमिस्टर परीक्षा घेण्यात येतील. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी, एम.एस्सी, एम.कॉम, अभियांत्रिकी, फार्मसी आदी शाखांच्या परीक्षांसाठी प्रश्नावलींची बँक तयार करण्यात येणार आहे.
प्रश्नावलींच्या बँकमुळे पेपरचे मूल्यांकन सुलभ पद्धतीने होईल. सामूहिक कॉपी प्रकाराला आळा बसेल. लेखी, आॅब्जेक्टिव्ह आणि इंटरनल या गुणपद्धतीचा समावेश असेल. प्रश्नांचे लिकेजेस थांबेल, यात दुमत नाही.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ