विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास बँकेची ना !
By Admin | Published: April 10, 2017 12:22 AM2017-04-10T00:22:34+5:302017-04-10T00:22:34+5:30
विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँके खात्यातच जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.
बँक आॅफ इंडियाचा प्रताप : विद्यार्थ्यांची गैरसौय
अमरावती : विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँके खात्यातच जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्याकरिता शिक्षक विद्यार्थ्यांना बँक खाते काढण्यासाठी सक्ती करीत आहे. पण काही विद्यार्थी बँक आॅफ इंडियाच्या गाडगेनगर शाखेत खाते काढण्यासाठी गेले असता त्यांना वाईट अनुभव आला. सकाळी या, नाहीतर खाते उघडण्यात येणार नाही. असे अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे तापत्या उन्हात त्या विद्यार्थ्यांना आल्यापावली परत जाण्याची वेळ आली.
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्या असून जिल्हयातील शाळा सकाळच्या सत्रात सुरु करण्यात आल्या आहेत. १ ते ९ व्या वर्गाच्या पर्यंत विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्वरित बँक खाते काढण्याचा सल्ला दिला. परंतु काही विद्यार्थ्यांची शाळा दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने व बँक आॅफ इंडियाच्या गाडगेनगरची शाखाची ही दुपारी २ वाजेपर्यंत सुरु असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून जाण्यास विलंब होतो. त्यामुळे गुरुवारीे दुपारी १.४५ वाजता काही विद्यार्थ्यानी खाते काढण्यासाठी पालकांसमवेत गाडगे नगर येथील बँक आॅफ इंडियामध्ये गेले होते. पण त्यांना येथील शाखा प्रथम कर्मचाऱ्यांकडून व नंतर शाखा व्यवस्थापकांकडून सकारात्मक वागणूक मिळाली नाही. व शाळेच वेळ काहीही असो बँकेच्या वेळेतच खाते काढण्यात येईल याकरीता सकाळी ९ वाजता या असे ठणकाविण्यात आले. पण सर्व शाळांची वेळ ही सकाळचीच असल्याने अनेक विद्यार्थी या वेळेत बँकेत येऊ शकत नाही. व विद्यार्थ्यांच्या परीक्षासुध्दा सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी बँक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांची निराशा होत आहे. त्यामुळे बँकांनी विद्यार्थ्यांचे बँक खाते त्वरीत काढण्यात यावे व त्यांना नाहक त्रास होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. व याकाळात विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी बँकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी जेणेकरुन विद्यार्थ्यांना व पालकांना त्रास होणार नाही, अशी मागणी पालकांनी केली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बँकेचे आॅनलाईन लिंकींग असल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. विद्यार्थ्यांनी बँकेच्या वेळेतच खाते काढण्यासाठी यावे, अन्यथा इतर बँकेत जावे, असे मत येथील शाखा व्यवस्थापकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)