बँकानी झुगारली जिल्हाधिकाऱ्यांची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 12:07 AM2017-07-13T00:07:49+5:302017-07-13T00:07:49+5:30
जिल्हा बँकर्सच्या एक जूनला झालेल्या बैठकीत पीककर्जवाटपाच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांना तातडीने खरीप कर्ज उपलब्ध करण्याची तंबी दिली होती.
१,२८६ कोटींचे वाटप बाकी : १२ दिवसांत दोन टक्काच कर्जवाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा बँकर्सच्या एक जूनला झालेल्या बैठकीत पीककर्जवाटपाच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांना तातडीने खरीप कर्ज उपलब्ध करण्याची तंबी दिली होती. मात्र, त्यानंतर १२ दिवसांत जिल्ह्यातील बँकांनी कर्जवाटपात केवळ दोन टक्केच प्रगती केल्याने बँकानी तंबी झुगारल्याची बाब स्पष्ट झाली आहे. बँकाच्या असहयोगामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
खरिपात जिल्ह्यातील बँकांना एक हजार ५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक असताना बँकांद्वारा सद्यस्थितीत ३० हजार १४३ शेतकऱ्यांना ३०६ कोटी ४० लाखांचे कर्जवाटप केले आहे. ही केवळ १९ टक्केवारी आहे. बँकानी अद्याप एक हजार २८६ कोटी १४ लाख रूपयांचे कर्जवाटप केले नाही. थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकाची ना आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सुद्धा बँका टाळाटाळ करीत असून जिल्हा बँकर्सच्या बैठकीत बँकांनी २७ हजार शेतकऱ्यांना २७० कोटी १७ लाखांचे वाटप केले होते. ही टक्केवारी १७ टक्के इतकी होती. केवळ १२ दिवसांत त्यात दोन टक्केच भर पडली.
तूर्तास राष्ट्रीयीकृत बँकांव्दारा ११ हजार ४१३ शेतकऱ्यांना १३३ कोटी ७१ हजारांचे वाटप केले आहे.
ही टक्केवारी १३ टक्के आहे. ग्रामीण बँकांनी २४२ शेतकऱ्यांना एक कोटी ९१ लाख रूपयांचे वाटप केले आहे. ही टक्केवारी १३ टक्के आहे तर जिल्हा बँकेने १८ हजार ४८८ शेतकऱ्यांना १७० कोटी ७८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. बँकाच्या या धोरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
जिल्हा बँकेचे वाटप ३३ टक्क्यांवर स्थिरावले
यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बँकेला ८८ हजार ८९० शेतकऱ्यांना ५१६ कोटी ६० लाख रूपयांच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक दिला होता. प्रत्यक्षात या बँकेने १८ हजार ४८८ शेतकरी खातेदारांना १७० कोटी ७८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. एप्रिल, मे व जून महिन्याच्या सुरूवातीला कर्जवाटप केल्यानंतर गेल्या महिन्याभरात याबँकेच्या वाटपाचा टक्का ‘जैसे थे’आहे.
राष्ट्रीयीकृत बँकाचा टक्का वाढेना
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकाना यंदा खरिपासाठी १,०२६ कोटींच्या कर्ज वाटपाचा लक्ष्यांक असताना अद्याप १३३ कोटींचे कर्जवाटप केले आहे.यामध्ये एसबीआयने केवळ १२ टक्के, सेंट्रल बँकेने ११ टक्के, बँक आॅफ महाराष्ट्रने १२ टक्केच कर्जवाटप केले आहे. शासन प्रशासनाला न जुमानता या बँकांनी शेतकऱ्यांप्रती असहकार्याचे धोरण कायम ठेवले आहे.