पीक कर्ज वाटपाच्या प्रारंभालाच बँकांचा असहकार
By Admin | Published: April 14, 2017 12:10 AM2017-04-14T00:10:35+5:302017-04-14T00:10:35+5:30
साधारणपणे एप्रिल महिन्यापासून खरीप कर्जाचे वाटप जिल्ह्यात सुरू होते. नंतरच्या महिन्यामध्ये वाटपाचा टक्का वाढतो.
गतवर्षीची कर्जवसुलीच नाही : शेतकऱ्यांना शासनाच्या तोडग्याची प्रतीक्षा
अमरावती : साधारणपणे एप्रिल महिन्यापासून खरीप कर्जाचे वाटप जिल्ह्यात सुरू होते. नंतरच्या महिन्यामध्ये वाटपाचा टक्का वाढतो. गतवर्षीच्या कर्जाची वसुली ही फक्त १० ते १५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याने बँकांनी वाढीव लक्ष्यांक घेण्यास व किंबहुना यंदाचे कर्ज वाटपास प्रारंभाला प्रशासनाला व पर्यायाने शेतकऱ्यांना असहकार केला आहे.
यंदाच्या खरीप व रबी हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेला ६३० कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना १,१५१ कोटी व ग्रामीण बँकांना १५९ कोटी रुपये असे एकूण १,९४१ कोटींचे लक्ष्यांक आहे. गतवर्षीच्या तुलनेत किमान १० टक्के वाढीव लक्ष्यांक आहे. गतवर्षीच्या तुलनेत किमान १० टक्के वाढीव लक्ष्यांक असावयास हवा होता. मात्र गतवर्षीच्या कर्जाची वसुलीच झाली नसल्याने बँकांची आर्थिक स्थिती डबघाईस आली व वाढीव लक्ष्यांक घेण्यास बँकांनी नकार दिल्याने प्रशासनाला २०४ कोटी ६८ लाखांनी लक्ष्यांक कमी करण्याची नामुष्की आली. राज्य शासनाने यापूर्वी पत्रक काढून सर्व बँकांनी शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जवाटपाचे निर्देश दिलेत, तर दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री दर्जा असणाऱ्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे बैठक आयोजित करून ३१ मे पूर्वी खरीप कर्जवाटपाचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. प्रत्यक्षात बँकांनी अद्याप खरिप हंगामाच्या कर्ज वाटपास सुरुवातच केली नसल्यामुळे बँका शासनाला किती जुमानतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेची ३१ मार्चअखेर स्थिती
जिल्हा बँकेकडे अल्पमुदती कर्जाची ३१ मार्च अखेर ३१२.७७ कोटी थकीत व ३९१.७१ कोटी चालू अशी एकूण ७०४.४९ कोटी कर्ज मागणी आहे. यामध्ये १६७.७९ लाख थकीत व ९५.१८ चालू अशी एकूण १११.९८ कोटी वसुली झाली. ही १६ टक्केवारी आहे.
मध्यम मुदती शेती कर्जामध्ये १११.१२ लाख थकीत व ६२.५३ लाख चालू अशी एकूण १७३.६४ लाखांची कर्ज मागणी आहे. त्या तुलनेत ४९७.५७ लाख थकीत व ७४६.३५ लाख चालू अशी एकूण १२४३.९२ लाख रुपयांची वसुली झाली. ही ७ टक्केवारी आहे.
शेती कर्जाची वसुली १४ टक्के
जिल्हा बँकेकडे ४२४.०६ लाख थकित ४५४.३० लाख चालू असे एकूण ८७८.३६ लाखांची कर्ज मागणी आहे. या तुलनेत ३१ मार्च अखेर २१७७.६६ लाख थकीत व १०२.६४ कोटी असे एकूण १२४.४२ कोटी रुपयांची वसुली झाली. ही १४ टक्केवारी आहे.