पश्चिम विदर्भातील बँकांनी ३५ टक्क्यांवरच गुंडाळले पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 07:45 PM2018-09-27T19:45:04+5:302018-09-27T19:45:44+5:30

शासनादेश झुगारला : दोन दिवसांत कसे करणार ५,३६० कोटींचे वाटप?

The banks of western Vidarbha gave crop loan only 35% | पश्चिम विदर्भातील बँकांनी ३५ टक्क्यांवरच गुंडाळले पीककर्ज

पश्चिम विदर्भातील बँकांनी ३५ टक्क्यांवरच गुंडाळले पीककर्ज

Next

- गजानन मोहोड, लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी विभागातील बँकांना ८२६३.८१ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना बँकांनी सद्यस्थितीत २९०३.८० कोटींचे कर्जवाटप केले, ही ३४.८४ टक्केवारी आहे. खरीप कर्जवाटपाला दोन दिवस बाकी असताना उर्वरित ५,३६० कोटींचे कर्जवाटप करणे अशक्य आहे. बँकांनी शासनादेश झुगारून कर्जवाटप गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी अडचणीत आलेले असल्याने पुन्हा अवैध सावकारी बोकाळणार असल्याचे वास्तव आहे.
यंदाच्या खरिपासाठी एक एप्रिलपासून पीक कर्जवाटपाला सुरूवात झाली. प्रत्यक्षात वाटपाला जून महिन्यापासून सुरू झाले. पेरणीच्या काळात कर्जवाटपाचा टक्का माघारला असल्याने विभागातील अमरावती, अकोला व यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जवाटपात सहकार्य न करणाऱ्या बँकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित खातेच बंद केलेत. त्यामुळे बँकांनी जुलै महिन्यात वाटपाचा टक्का वाढविला. मात्र, ऑगस्टनंतर पुन्हा कर्जवाटप माघारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कर्जमाफीचा घोळ निस्तरलेला नाही. विभागात अद्याप तीन लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, तर थकबाकीदार असल्याने बँकाही कर्ज देत नाहीत. आता बँकांनी खरिपाचे कर्जवाटपच बंद केले असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँका कर्जवाटपात माघारल्या
यंदाच्या कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँका माघारल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी ५२६० कोटींचे कर्जवाटप लक्ष्यांकाच्या तुलनेत १,३२,४६५ शेतकऱ्यांना ११७२ कोटींचे वाटप केले, ही २२.२८ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना ७४७ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना हंगामाअखेर १३,८८४ शेतकऱ्यांना ११३ कोटींचे वाटप केले. ही ३४.८४ टक्केवारी आहे. जिल्हा बँकांना २२५६.३६ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत १,७८,४११ शेतकऱ्यांना ९६६.६१ कोटींचे कर्जवाटप केले, ही ४२.६१ टक्केवारी आहे. यवतमाळ व बुलडाणा जिल्हा बँकेचे वाटप उल्लेखनीय राहिले.

विदर्भ व मराठवाड्यातील बँकांचा खरीप कर्जवाटपात असहकार राहिला. अत्यंत कमी कर्जवाटप झाल्याने तोडगा काढण्यासाठी ‘एसएलबीसी’सोबत शुक्रवारी बैठक होऊ घातली आहे. शेतकऱ्यांनी कर्जवाटपासंबंधी तक्रारी माझ्या वॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवाव्यात.
- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन

Web Title: The banks of western Vidarbha gave crop loan only 35%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.