बँका स्वीकारणार फाटक्या नोटा
By admin | Published: March 30, 2015 12:13 AM2015-03-30T00:13:49+5:302015-03-30T00:13:49+5:30
अनेकदा फाटक्या नोटांमुळे नामुष्कीचे प्रसंग ओढवतात. मात्र, आता फाटकी नोट कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतून बदलून घेता येणार आहे.
अमरावती : अनेकदा फाटक्या नोटांमुळे नामुष्कीचे प्रसंग ओढवतात. मात्र, आता फाटकी नोट कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतून बदलून घेता येणार आहे. यासाठी त्या बँकेत तुमचे खाते असणेही गरजेचे नाही. या संदर्भातील निर्देश नुकतेच रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने सर्व बँकांना दिले आहेत.
ही प्रक्रिया १९ मार्चपासून सुरू होईल. यानंतर सर्व बँकांना फाटक्या नोटा स्वीकाराव्या लागतील. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात राष्ट्रीय बँकांना खडे बोल सुनावले असून यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांना फाटक्या नोटा बदलून देण्यासंदर्भात निर्देश दिले होते. मात्र, त्याचे पालन न झाल्याने रिझर्व्ह बँकेला आता कडक भूमिका घ्यावी लागली आहे.
आरबीआयने फाटक्या नोटांसंदर्भात यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार आम्ही ग्राहकांना फाटक्या नोट बदलून देतो. आमच्याकडे सॉईल नोटांचा साठा आहे. यासर्व नोटा आम्ही आरबीआयकडे पाठवून बदलून घेतल्या आहेत. वर्षभर अशा फाटक्या नोटा जमा करुन आम्ही एकदाच आरबीआयकडे पाठवितो. आरबीआय अशा सॉईल नोटा नष्ट करते आणि त्याऐवजी त्याच रकमेच्या नव्या कोऱ्या नोटा बदलून देते. कुणाला नोटा बदलवून घ्यायच्या असतील तर त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत येऊन नवीन नोटा घेऊन जाव्यात, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नोटा बदलून देणे अनिवार्य
एखाद्या बँकेने फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर सर्वप्रथम त्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे लेखी तक्रार करावी, त्याची एक प्रत रिझर्व्ह बँकेकडे पाठवावी. एखादा ग्राहक फाटकी नोट घेऊन आला तर वैयक्तिक विनंतीवरुन बँकेला ती नोट बदलवून द्यावी लागेल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ग्राहक केवळ फाटक्या नोटा बदलण्याकरिता बँकेत जाऊ शकतो. बँकेत खाते असो विा नसो ग्राहकाला बँकेतून फाटकी नोट बदलवून मिळेल.