बियाणी चौकामागील झुडपांनी घेतला पेट
By admin | Published: April 15, 2017 12:06 AM2017-04-15T00:06:15+5:302017-04-15T00:06:15+5:30
बियाणी चौकातील स्टेट बँकेमागील परिसर दुपारच्या सुमारास अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
दोन एकरात पसरली आग : आग विझविण्यासाठी डीसीपींचा धाडसी पुढाकार
अमरावती : बियाणी चौकातील स्टेट बँकेमागील परिसर दुपारच्या सुमारास अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. परिसरात साचलेल्या केरकचऱ्याने व वाळलेल्या झडुपांनी पेट घेतल्याने ही आग झपाट्याने पसरली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, आग रौद्ररूप धारण करीत असल्याचे पाहून पोलीस उपायुक्त शशीकुमार मिना यांनी आगीच्या वेढ्यात शिरून स्वत: आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तब्बल २ एकरांत ही आग पसरली होती.
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेमागील परिसरात झाडेझुडुपी वाढली आहेत. या बँकेच्या संरक्षण भिंतीजवळ अनेक लोक कचरा गोळा करतात. परिसरात आगी लागल्याच्या घटना बहुधा घडल्यात. शुक्रवारी दुपारी १२ वाजता या कचऱ्याने अचानक पेट घेतला. काही वेळातच आग पसरू लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तासाभरानंतरही आग आटोक्यात येईना. वाऱ्यामुळे आगीचा विस्तार वाढतच होता. याच परिसरात काही अंतरावर महापौर बंगला व शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. आग त्यादिशेने सरकत असल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तातडीने याची दखल घेत काही कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. आग निवासस्थानांपर्यंत पोहोचल्यास तेथील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्यात. दरम्यान पोलीस उपायुक्त मीना यांनी आगीचा वाढता प्रकोप लक्षात घेता तातडीने अग्निशमन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. स्वत: आगीच्या वेढ्यात शिरून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. डीसीपी शशीकुमार मीना यांच्या या कर्तव्यतत्परतेची परिसरात चर्चा होती. (प्रतिनिधी)
पोलीस, अग्निशमन विभागाची मोलाची कामगिरी
पोलीस यंत्रणेतील सहायक पोलीस आयुक्त पी.डी.डोंगरदिवे, गुन्हे शाखेचे प्रमेश आत्राम यांच्यासह मोठा पोलीस ताफा आग नियंत्रणासाठी एकत्र आला होता. डोंगरदिवे यांनी झुडुंपांमध्ये प्रवेश करून अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना मदत केली. अग्निशमनचे प्रभारी अधीक्षक भरतसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात फायरमन प्रेमानंद सोनकांबळे, विलास गोमेकर, सैय्यद अनवर, राजेश गजभे, अतुल कपल, राजेश अलोडे, निखील भाटे, ड्युटी इनचार्ज मच्छिंद्र यादव, चालक राजेंद्र लोणारे, सोहेब खान, राजेश अलोडे यांनी तब्बल दीड तासांत सहा पाण्याच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले.