बापरे, १८० दिवसांत ११,७१५ जणांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:33+5:302021-07-21T04:10:33+5:30

प्रदीप भाकरे अमरावती : मोकाट श्वानांमुळे शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराबरोबर ज‌िल्ह्यात भटक्या श्वानांचे प्रमाण ...

Bapare, 11,715 people were bitten by dogs in 180 days | बापरे, १८० दिवसांत ११,७१५ जणांना श्वानदंश

बापरे, १८० दिवसांत ११,७१५ जणांना श्वानदंश

Next

प्रदीप भाकरे

अमरावती : मोकाट श्वानांमुळे शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराबरोबर ज‌िल्ह्यात भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले असून, लहान मुलांपासून ते वाहनचालक, प्राणी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल ११,७१५ व्यक्तींना श्वानांनी चावा घेतला. त्यात अमरावती शहरातील ७ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश आहे.

दोन महिन्यांपूर्वी दर्यापूर शहरात एका भटक्या श्वानाने १३ जणांना चावा घेतला, तर ४ जुलै रोजी सकाळी श्वानांनी केलेल्या हल्ल्यात एका हरणाचा मृत्यू झाला होता. दोन गंभीर जखमीही झाले होते. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून श्वान निर्बिजिकरणात हाराकिरी होत असल्याने मोकाट श्वानांच्या संख्येत भर पडली आहे. शहरातून रात्री जाताना श्वान मागे धावतात. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. शहरातील झोपडपट्टी भागात मोकाट श्वानांचा मुक्त संचार असला, तरी अन्य भागातील रस्त्यांवरदेखील मोकाट श्वानांचे कळप आढळून येतात. एकट्या इर्विन रुग्णालयात सहा महिन्यांत श्वानदंशाच्या तब्बल ७,२९७ केसेसची नोंद घेण्यात आली. मोकाट श्वानांचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या प्रशासन याबाबत कोणतीही उपायोजना करत नसल्यामुळे नागरिकांनीच सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. इर्विन रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध असून, कुत्र्याने चावा घेतल्यास ही लस तातडीने टोचून घेणे आवश्यक आहे.

बॉक्स १

मोकाट फिरणाऱ्या श्वानांपासून धोका अधिक

शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांपासून धोका अधिक आहे. झुंडीने राहणाऱ्या श्वानांमध्ये पिसाळण्याची शक्यता अधिक असते. अस्वच्छ खाणे, अस्वच्छ वातावरणासह काही अन्य कारणांमुळे रेबीजचे विषाणू श्वानाच्या शरीरात प्रवेश करू शकतात. हे विषाणू त्याच्या लाळेत असतात. पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यानंतर लाळेतून इतरांना संसर्ग झाल्यास रेबीजची लागण होण्याचा धोका असतो.

बॉक्स २

येथे श्वानांचा वावर

कचरा कुंडीसह मटण, चिकनची दुकाने, चायनीजची दुकाने, कत्तलखाने व कंपोस्ट डेपो परिसरात श्वानांच्या झुंडी कायम आहेत. चायनीजच्या गाड्यांवरील कचरा कोंडाळा किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. त्यामुळे अशा परिसरात श्वानांचा वावर वाढला आहे.

लक्षणे

रेबीज झालेल्या रुग्णाला साधारणपणे ताप आणि तापाची लक्षणे, मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची भीती वाटते. त्याचा घसा पूर्णपणे खरडून निघतो व तो बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी श्वानांच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो.

उपचार -

श्वान चावल्याने जखम झाल्यावर लवकर ती स्वच्छ करावी, त्यामुळे रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीजवर ॲन्टीरेबीज व्हॅक्स लस उपलब्ध आहे. रुग्णाने रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस घेतले पाहिजे. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात, चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत.

श्वान चावल्यावर उपाय -

जखम स्वच्छ साबणाने धुवून काढावी, जंतुनाशक लावावे, जास्त रक्तस्त्राव होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

हे टाळा -

जखमेवर चुना, हळद, माती, तंबाखू, चहा पावडर, लिंबू असे पदार्थ लावू नये

जखमेला पट्टी बांधू नये, टाके घालू नयेत

जानेवारी ते जूनपर्यंत झालेली नोंद

दवाखाना : श्वानदंश केसेस

इर्विन : ७२९७

ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी : ४०३

ग्रामीण रुग्णालय भातकुली: १७४

ग्रामीण रुग्णालय, चांदूर बाजार : २८७

ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे : ३२१

ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा : ३२

ग्रामीण रुग्णालय, चुरणी: ३९

ग्रामीण रुग्णालय, धामणगाव : १००

ग्रामीण रुग्णालय, नांदगाव : ३००

ग्रामीण रुग्णालय, तिवसा : २१३

ग्रामीण रुग्णालय, वरूड : ४३२

उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर: ७८०

उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर : ३४४

उपजिल्हा रुग्णालय, धारणी ५९५

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी : ३९८

Web Title: Bapare, 11,715 people were bitten by dogs in 180 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.