बापरे : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे १६४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:31+5:302021-08-24T04:16:31+5:30

इंदल चव्हाण - अमरावती : जिल्ह्यात कोरोनानंतर आता डेंग्यू आजाराने थैमान घातले असून शनिवारी प्राप्त अहवालात १४९ डेंग्यूचे रुग्ण, ...

Bapare: 164 positive for dengue, malaria, chikungunya | बापरे : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे १६४ पॉझिटिव्ह

बापरे : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे १६४ पॉझिटिव्ह

Next

इंदल चव्हाण - अमरावती : जिल्ह्यात कोरोनानंतर आता डेंग्यू आजाराने थैमान घातले असून शनिवारी प्राप्त अहवालात १४९ डेंग्यूचे रुग्ण, ११ मलेरियाचे, तर ४ चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तिवसा तालुक्यात सर्वाधिक २० रुग्णांची नोंद झाली असून, यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव जेमतेम कमी झाला, तर डेंग्यू या जीवघेण्या आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातून डेंग्यू व चिकनगुनिया संशयित ८६१ जणांचे रक्तजल नमुने अकोला येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यामध्ये १४९ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह, चिकनगुनियचे ४ आणि मलेरिया संशयित १ लाख ६४ हजार ८५३ रक्त नमुन्यांपैकी ११ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात ४३ आणि ग्रामीण भागात १०६ डेंग्यू रुग्णांचा समावेश आहे.

बॉक्स

सर्वेक्षणाचे सीईओंचे आदेश

जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण प्रकर्षाने आढळून येत असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ज्या तालुक्यात रुग्ण आढळले, तेथे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहे. यामध्ये आतापर्यंत अमरावती तालुक्यातील १३ गावे, भातकुली ५, चांदूर रेल्वे ३, दर्यापूर ५, चांदूर बाजार ७ चांदूर रेल्वे ४ व अन्य तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आहे.

--

ही घ्या काळजी

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आजार हा डास चावल्याने होतो. सध्या डासांच्या उत्पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे. डास होऊ नये यासाठी घर, परिसर स्वच्छ ठेवा, डबके साचू नये, अशी व्यवस्था करा, अनावश्यक निकामी वस्तूंची विल्हेवाट लावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर केल्यास डासांपासून संरक्षण होऊन आजारावर नियंत्रण मिळविता येईल.

---

या केल्या उपाययोजना

डेंग्यू, मलेरिया आजाराच्या नियंत्रणासाठी शहरासह ग्रामीण भागात यंत्रणा कार्यरत आहे. सर्व आरोग्य केंद्रात औषधी, कीटकनाशक औषधी उपलब्ध केले आहे. जिल्ह्यात ४५४ गप्पी मासे निर्मिती केंद्र आहेत.

कोट

डेंग्यू हा एक व्हायरल आजार आहे. त्यामुळे परिसरात डबके साचू नये, याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी. ताप अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. आरोग्य यंत्रणेला सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे.

- डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधकिारी

Web Title: Bapare: 164 positive for dengue, malaria, chikungunya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.