बापरे, छोट्याशा गावात गुटख्याची पॅकिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:24+5:302021-07-19T04:09:24+5:30
पान २ ची लिड मशीन जप्त, आरोपीला अटक, सूत्रधार, वितरक शोधण्याचे आव्हान अंजनगाव सुर्जी : राज्यात गुटखाबंदी असली तरी, ...
पान २ ची लिड
मशीन जप्त, आरोपीला अटक, सूत्रधार, वितरक शोधण्याचे आव्हान
अंजनगाव सुर्जी : राज्यात गुटखाबंदी असली तरी, शहरात त्याची अवैध निर्मिती केली जाते. तेथून गावोगावी गुटख्याचे वितरण केले जात आहे. मात्र, प्रतिबंधित गुटख्याच्या निर्मिती व पॅकिंगचे लोण आता ग्रामीण भागातही पसरल्याचे एका पोलिसी कारवाईतून समोर आले आहे. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी धाडी गावात धाड टाकून तेथून गुटखा पॅकिंग करणाऱ्या मशीनसह प्रतिबंधित गुटखा जप्त केला. १७ जुलै रोजी ही कारवाई केली.
अंजनगाव सुर्जी पोलिसांनी संदीप रामदास जाधव (३५, रा. धाडी) याच्या घरी रेड केली असता त्याचे घरातून १ लाख ३० हजार रुपये किमतीची गुटखा पॅक करण्याची मशीन व ९ हजार ३० रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्यासह एकूण १ लाख ३९ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली. गेली कित्येक दिवसांपासून अवैधपणे गुटखा तयार करण्याचे काम तेथे सुरू होते. त्या गुटख्याचे पॅकिंग करून तो माल बाजारात विकण्याचे कामदेखील चालत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सपकाळ, पोलीस अंमलदार पवन पवार, विशाखा कैकाडे यांनी केली.
बॉक्स
पोलिसांना खोलात जावे लागेल
आरोपीचा महागडी मशीन बाळगण्याचा उद्देश, त्याने ती कुठून आणली, तो किती दिवसांपासून गुटखा निर्मिती करीत होता?, या धंद्यात कोण-कोण सहभागी आहेत? याबाबत पोलिसांना सूक्ष्म चौकशी करावी लागणार आहे. छोट्याशा गावात अवैध गुटखा निर्मिती करण्यामागे आरोपीचा उद्देश, तो गुटखा कुठे वितरित करीत होता, या दिशेने स्थानिक पोलिसांनी तपास चालविला आहे.
कोट १
धाडी गावातील एका घरातून गुटखा पॅकिंग करण्याच्या वापरात येणारी मशिनसह प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
- व्ही. सी. पोळकर, ठाणेदार
अंजनगाव सुर्जी, पोलीस ठाणे
बॉक्स
जागोजागी मिळतो गुटखा
शहर तथा तालुक्यात खुलेआम गुटखा पुड्या मिळतात. त्यावर कुणाचाही धरबंद नाही. पानटपरीपासून ते थेट छोट्या किराणा दुकानातून गुटखा विनासायास मिळत असल्याने त्याचे वितरण गावोगावी, खेडोपाडी निर्धोकपणे होत असल्याचे स्पष्टच आहे.