बाराद्वारी : विहिरीत घर की घरात विहीर..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:21 PM2023-03-31T12:21:20+5:302023-03-31T12:22:19+5:30

स्थापत्यकलेचा अद्भूत वारसा, १२ खोल्यांची सतराव्या शतकातील विहीर

'Baradwari', a wonderful architectural legacy; a 12-room seventeenth-century ancient well at jarud amravati | बाराद्वारी : विहिरीत घर की घरात विहीर..?

बाराद्वारी : विहिरीत घर की घरात विहीर..?

googlenewsNext

प्रशांत काळबांडे

जरूड (अमरावती) : 'बावडी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनेक विहिरी ऐतिहासिक ठरल्या आहेत. पण, वरूडपासून अवघ्या नऊ किमी अंतरावर १,२०० लोकसंख्येच्या पवनी संक्राजी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील 'बाराद्वारी' स्थापत्यकलेचा अद्भूत वारसा ठरली आहे. बारा खोल्यांची सतराव्या शतकातील ही विहीर आहे.

२०० वर्षांपूर्वी मुघल इंग्रज काळातील पुरातन विहिरीचे वैशिष्ट्य असे की, त्याच विहिरीमध्ये एक घर आणि मंदिर आहे. या विहिरीच्या आजूबाजूला दगडांमध्ये पुरातन मूर्तिकला पाहायला मिळते. या विहिरीच्या आत बारा दरवाजे आहेत म्हणून या विहिरीला 'बाराद्वारी विहीर' असे म्हटले जाते.

ही विहीर अष्टकोनी असून, बांधकाम विटांनी केलेले आहे. पवनी संक्राजी या गावातील श्याम घारड आणि मोहन घराड यांच्या गट क्र. १०५ मधील शेतातील या विहिरीत एक पुरातन घर आणि मंदिर आहे. या विहिरीत उतरायला पायऱ्या असून, नागरिकांच्या मनात अनेक भ्रामक कल्पना आहेत. १८७०च्या आसपास सीताराम सातपुते नामक व्यक्तीने ही विहीर बनवून घेतली, असे ग्रामस्थ सांगतात. विहिरीच्या बाजूला जमिनीवर एक घर आहे. कालांतराने वरती असलेले घर नामशेष झाले. पण, विहिरीत असलेलं घर आणि मंदिर जसेच्या तसे पाहायला मिळते.

इतिहास संशोधकांच्या मते, ही विहीर मोगल काळातील असू शकते आणि १७व्या दशकातील या विहिरीचे बांधकाम झाले असावे. मंदिरात कदाचित मूर्ती असाव्यात. पण, आता त्या नामशेष झाल्या असाव्यात. या विहीर आणि विहिरीतील घराचे संशोधन करून अधिकची माहिती समोर यावी आणि हे पर्यटनस्थळ बनावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: 'Baradwari', a wonderful architectural legacy; a 12-room seventeenth-century ancient well at jarud amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.