बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये छुप्या मार्गाने दारुविक्री, अभय कुणाचे?
By admin | Published: April 9, 2017 12:05 AM2017-04-09T00:05:37+5:302017-04-09T00:05:37+5:30
राज्य महामार्गावरील मद्यविक्रीला बे्रक लागल्यानंतर मद्यपी सैरभैर झाले आहेत.
पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : निर्जनस्थळी मद्य प्राशनाचे प्रमाण वाढतेय
अमरावती : राज्य महामार्गावरील मद्यविक्रीला बे्रक लागल्यानंतर मद्यपी सैरभैर झाले आहेत. मात्र, अजूनही महामार्गावरील काही बारमध्ये रेस्टॉरेंटच्या नावाखाली छुप्या मार्गाने मद्यविक्री सुरूच आहे. बडनेरा मार्गावरील काही बार अॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये मद्यविक्री सुरूच असल्याचे आढळून येत आहे. मात्र, याकडे पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरात अवैध दारूची विक्री सुरू असल्याचे पोलीस कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडसत्र राबवून अवैध दारू जप्तसुद्धा केली आहे. राज्य महामार्गावरील शेकडो मद्यविक्रीची प्रतिष्ठाने व बार अॅन्ड रेस्टॉरेंटचे शेटर्स बंद असल्याचे दिसून येत आहे. मात्र, छुप्या मार्गाने मद्यविक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील मद्यविक्री बंद केल्यामुळे मद्यपी हे सैरभैर भटकताना आढळून आले. त्यामुळे महामार्गापासून पाचशे मीटरपासून दूर अंतरावरील मद्यविक्री प्रतिष्ठाने व बारवर मोठी गर्दी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आता महामार्गावरील मद्यविक्रेता पाचशे मीटरच्या आत मद्यविक्रीच्या जागेच्या शोधात असून त्या ठिकाणी लवकरच दारू विक्री प्रतिष्ठाने उघडण्याची शक्यता आहे. या दारुबंदीमुळे अनेक मद्यपींना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ज्या ठिकाणी मद्यविक्री सुरू आहे, त्या प्रतिष्ठानातून पार्सल घेणे आणि निर्जनस्थळी जाऊन दारू पिण्याचे कार्यक्रम सद्यस्थितीत अधिक प्रमाणात वाढले आहे. त्यातच मद्यविक्रीचे मुख्य केंद्र म्हणजे बार अॅन्ड रेस्टॉरेंट बनत असल्याचे आढळून येत आहे. शहरातील काही बार अॅन्ड रेस्टांरटमध्ये टेबलावर बसून दारू पिण्याचे प्रकार सुरू आहेत. काही ठिकाणी पार्सल सेवासुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ही एकाप्रकारे न्यायालय निर्णयाची अवहेलनाच असून याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
अवैध दारू विक्रीला जोर
दारु बंदीमुळे अवैध दारु विके्रेत्यांची आता चांदी झाली आहे. दारू दुकाने ५०० मिटरपर्यंत हद्दपार केल्यामुळे स्लम परिसरात अवैध दारुचे प्रमाण वाढले आहे.
बनावट दारू विक्री जोरात
मद्यविक्री बंदच्या नावावर आता मद्यप्रदेशातील दारुचा खपसुद्धा वाढल्याची चर्चा मद्यपीमध्येच आहे. शहरातील काही बारमध्ये विदेशी दारुची विक्री केली जात आहे. मात्र, ती दारू बनावट असल्याचे मद्यपींना त्या दारुच्या चवीवरून निदर्शनास आले आहे. मात्र, याबाबत बोभाटा करण्याचे धाडस मद्यपींमध्ये नसल्याने आढळून येत आहे.
मद्यविक्री बंदच्या निर्णयानंतर अवैध दारू विक्री वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गावरील दुकाने व बारची एक्साईजकडून वेळोवेळी तपासणी सुरू असून अद्याप काही आढळून आले नाही. मात्र, छुप्या पद्धतीने जर दारूविक्री सुरु असेल, तर कारवाई करण्यात येईल.
- प्रमोद सोनोने, अधीक्षक