शाळांच्या आवारात होणार ‘आधार’ नोंदणी
By admin | Published: June 16, 2016 12:37 AM2016-06-16T00:37:23+5:302016-06-16T00:37:23+5:30
आधार नोंदणीचे शतप्रतिशत उद्दिष्ट गाठण्यासाठी आता शाळांच्या आवारात विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना ...
शासनाचे आदेश : ५ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची नोंदणी
अमरावती : आधार नोंदणीचे शतप्रतिशत उद्दिष्ट गाठण्यासाठी आता शाळांच्या आवारात विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ५ ते १८ या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात १३ जूनला विशेष परिपत्रक काढले आहे. राज्यातील ५ ते १८ वयोगटातील मुलांचे आधार नोंदणी करणे आवश्यक असून त्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शिक्षण विभागातील उच्चपदस्थांना देण्यात आल्या आहेत.
३० एप्रिल २०१६ पर्यंत ८२.८ टक्के मुलांचे आधारकार्ड नोंदणी झाली आहे. उर्वरित नोंदणीसाठी शाळांच्या आवारात कॅम्प घेण्याच्या सूचना प्रसृत करण्यात आल्या आहेत. याकरिता ‘युएडीएआय’ तांत्रिक मदत करणार आहे.
शासनातर्फे आधार नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे त्यासाठी ठिकठिकाणी आधार नोंदणी केंद्रदेखील उभारण्यात आले आहेत. परंतु तरीही अनेक मुले-मुली आधार नोंदणीपासून वंचित असल्याने आता शाळांमधूनच आधार नोंदणी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे आधार नोंदणीसाठी वेगळी जनजागृती करण्याची गरज उरणार नाही.
या नोंदणीच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या दिशेने पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून शाळा-शाळांमध्ये आधार नोंदणी प्रक्रिया केली जाईल. (प्रतिनिधी)
शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी
शतप्रतिशत आधार नोंदणी करण्यासाठी व त्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्हाधिकारी व उपायुक्तांना सूचना देऊन आधार नोंदणीचे काम प्रभावीपणे करण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्तांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
९० टक्के नोंदणी आवश्यक
५ ते १८ वयोगटातील मुलांचे पुढील तीन महिन्यात कमीत कमी ९० टक्के आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. उन्हाळ्यात सुटीत एक व शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित कॅम्प घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी व उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत.