समृद्धि कॉरीडोर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आधार
By admin | Published: August 25, 2016 12:12 AM2016-08-25T00:12:36+5:302016-08-25T00:12:36+5:30
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणारा व शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धि आणणारा....
बैठक : जिल्हाधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
धामणगाव रेल्वे : राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणारा व शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धि आणणारा मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हाय-वे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे़ भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतापदादा अडसड यांनी शेतकरी व शासन यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेतली असून धामणगाव मतदारसंघात बैठकींना वेग आला आहे़
मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हाय-वे तयार करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुढाकार घेतला आहे़ शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी व प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू व्हावे, या संदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी झाडा, झाडगाव, आष्टा, चिंचोली या गावातील संबंधित शेतकऱ्यांची बैठक पंचायत समिती भवनात घेतली़ बैठकीला उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती़
सन २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीच्या शासकीय भावानुसार पावणेचार पट मोबदला किंंवा भागीदारी पद्धतीमध्ये सहभागी झाल्यास भूखंड व दहा वर्षांपर्यंत शेतजमिनी प्रमाणेमोबदला असे पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत.
विशेषत: आपल्याकडे सद्यस्थितीत असलेली शेतजमीन शेतकऱ्यांना विकण्यासाठी कोणतेही बंधन नाही. मात्र, भागिदारी पद्धत ही शेतकऱ्यांचे जीवन उंचविणारी आहे. मौजाप्रमाणे मूल्यांकन काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून शेतकऱ्यांना सर्व बाबींची माहिती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या बैठकीत सांगितले़
धामणगाव मतदार संघातील नांदगाव खंडेश्वर व चांदूररेल्वे तालुक्यातील प्रत्येकी नऊ व धामणगाव तालुक्यातील पंधरा गावांतून हा प्रकल्प जाणार असल्याने शेतकऱ्यांना सर्वतोपरी माहिती मिळावी व प्रकल्पाचे काम गतीने सुरू व्हावे, याकरीता धामणगावसह चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर या दोन्ही तालुक्यांत बैठकी लावण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रताप अडसड यांनी दिली. शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन प्रताप अडसड यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)