महापालिकेला ‘करा’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:22 PM2018-04-01T23:22:54+5:302018-04-01T23:22:54+5:30
आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेला वाढीव कर उत्पन्नाने आधार दिला आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ३६.४३ कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेला वाढीव कर उत्पन्नाने आधार दिला आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ३६.४३ कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले. २०१६-१७ च्या तुलनेत मालमत्ता करात ६.०९ कोटींची घसघशीत वाढ नोंदविली गेली. या वृद्धीने हरखून न जाता यंदाच्या वर्षात मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण व करनिर्धारणाकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. ३१ मार्चअखेर ४७.२२ कोटी एकूण मागणीच्या तुलनेत ३६.४३ कोटींची वसुली बुडत्याला काठीचा आधार ठरली आहे.
२०१७-१८ या आर्थिक वर्षाची एकूण मागणी ४७.२२ कोटी होती. त्यापैकी ३६.४३ कोटी अर्थात ७७.१६ टक्के वसुली झाली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ४१.५९ कोटी मागणीच्या तुलनेत ३०.३४ कोटी अर्थात ७२.९५ टक्के वसुली झाली होती. अर्थात सरत्या आर्थिक वर्षात करवसुलीत सरासरी चार टक्के वाढ नोंदविण्यात आली. २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ च्या मालमत्ता कर मागणीत ५.६३ कोटींनी वाढ झाली होती. तो विचार करता, सरत्या वर्षात सहा कोटींनी वसुली वाढली असल्याचे म्हटल्यास मागणीतही वाढ झाल्याची बाब लक्षात घेण्याजोगी आहे. महापालिकेचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या शतप्रतिशत वसुलीसाठी आयुक्त हेमंत पवार आग्रही होते. त्यांनी झोननिहाय बैठका घेऊन आढावा घेतला. प्रसंगी कर यंत्रणेला तंबीही दिली. त्याचा परिपाक यंदाच्या वसुलीत झाला. ती ७७.१६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आयुक्त हेमंत पवार आणि मावळते स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या प्रयत्नाने कर यंत्रणेने २० हजार नव्या मालमत्ता कराच्या अखत्यारीत आणून मागणीत १० कोटींची भर घातली होती. मागणी वाढल्यानेही करवसुली ७७ टक्क्यांवर पोहोचू शकली. ३१ मार्चला महापालिकेने तीन कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली.
पिठे, वाटाणे, पकडे, डेंगरे चमकले
करवसुलीची संपूर्ण मदार सहायक आयुक्त, सहायक क्षेत्रीय अधिकारी व कर लिपिकांसह मूल्यनिर्धारक व कर संकलन अधिकाऱ्यांवर होती. त्यात रामपुरी कॅम्पचे योगेश पिठे हे मेरिट ठरले व सुनील पकडे, मंगेश वाटाणे, अमित डेंगरे या सहायक आयुक्तांनी ७१ ते ७८ टक्के वसुली करून फर्स्ट क्लास मिळविला. त्यातही सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे यांनी अवघ्या एक महिन्यापूर्वी बडनेरा झोनचा कारभार हाती घेतला. ९.९८ कोटी रुपयांची वसुली करून ते पिठेंपाठोपाठ दुसºया क्रमांकावर राहिले. भाजीबाजारचे सहायक आयुक्त संजय गंगात्रे वसुलीचा आकडा वाढवू शकले नाहीत.