‘सदेह वैकुंठ गमन’ पुस्तकावर बंदी आणा
By admin | Published: August 10, 2016 12:04 AM2016-08-10T00:04:58+5:302016-08-10T00:04:58+5:30
‘संत तुकाराम सदेह वैकूंठगमन’या पुस्तकात लेखक निवृत्ती वक्ते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व युगप्रवर्तक ग्रंथ ग्रामगीतेवर वादग्रस्त लिखाण केले आहे.
मागणी : विविध संघटनांचे तहसीलदार, ठाणेदारांना निवेदन
तिवसा : ‘संत तुकाराम सदेह वैकूंठगमन’या पुस्तकात लेखक निवृत्ती वक्ते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व युगप्रवर्तक ग्रंथ ग्रामगीतेवर वादग्रस्त लिखाण केले आहे. या पुस्तकावर तत्काळ बंदी आणून 'त्या' लेखकावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विविध संघटनांनी मंगळवारी तिवसा तहसीलदार व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात केली.
निवृत्ती वक्ते यांनी 'संत तुकाराम महाराज सदेह वैकूंठगमन' या पुरस्तकात विकृत लिखाण केले. यामुळे लाखो गुरुदेवभक्तांच्या भावनेला ठेच पोहोचली. ग्रामगीतेला संडास साफ करणारी गीता, असे संबोधिले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरदेखील अनेक खोटारडे व घाणेरडे आरोप करण्यात आलेले आहे.
राष्ट्रसंतांची ग्रामगीता आदर्श ग्रंथ म्हणून घराघरांत वाचण्यात येते. मात्र या युगग्रंथावर टीका करीत लेखक निवृत्ती वक्ते यांनी दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या लेखकाने केला आहे. या समाजद्रोही लेखकाला तत्काळ अटक करावी व या पुस्तकावर तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी तिवसा तहसीलदार व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
यावेळी रवी खडतकर, संजय देशमुख, पवन दवंडे, भूषण यावले, दिलीप शापामोहन, जानराव मनोहरे, रामभाऊ टेकाडे, प्रमोद वाट, राज माहोरे, बाळाभाऊ देशमुख, सुरज दहाट, स्वप्निल उमप, आशिष कोल्हे, वीरेंद्र वानखडे, मोहन दरेकर, गौरव पोलाड, संदीप दहाट यांच्यासह लढा संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा विचारमंच, शिवगर्जना युवा संघटना, रतनगीर महागार गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच या संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)